महाराष्ट्र वेदभुमी

मातोश्रीवर नवअन्न तोरणाची अखंड परंपरा कायम — श्रद्धा, संस्कार आणि शिवसैनिकांचा उत्साह !

अलिबाग (ओमकार नागावकर) : निसर्गाशी असलेले अटूट नाते आणि परंपरेची अखंड परंपरा जपत शिवसैनिकांच्या श्रद्धास्थान ‘मातोश्री’वर यंदाही नवान्न पौर्णिमेनिमित्त नवअन्न तोरण बांधण्यात आले... कोकणातील कृषिसंस्कृती, भक्तिभाव आणि शिवसेनेच्या संघटित संस्कारांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा मातोश्रीवर दरवर्षीप्रमाणेच यंदाही उत्साहात पार पडला...

गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या पुढाकाराने मातोश्रीवर हे ‘नवअन्न तोरण’ बांधण्याची परंपरा अखंड सुरु आहे... निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नवीन अन्नधान्याच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी हा शुभ सोहळा दरवर्षी पार पडतो...

या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने नवअन्न तोरण बांधण्यात आले... याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी “बळीराजा सुखी होऊ दे, आपल्या मातीत पुन्हा भरभराट नांदो, आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात समृद्धीचे दिवे कायम पेटत राहू देत,” अशा भावपूर्ण शुभेच्छा दिल्या. ठाकरे यांच्या या संदेशाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि भावनिक ऊर्जेची लहर पसरली...

नवान्न पौर्णिमा म्हणजे नवीन धान्याची पौर्णिमा — कोकणातील शेतकरी वर्ग या दिवशी निसर्गमातेचे आभार मानत नवीन पीक घरात आणतो... दसऱ्याच्या सुमारास सर्व धान्य घरात आल्यावर, दिवाळीपूर्वी आठ दिवस आधी साजरा होणारा हा उत्सव समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घराघरात ‘नवे’ म्हणजे धान्याचे भारे बांधले जातात, दारात रांगोळ्या आणि दिव्यांची सजावट केली जाते, आणि धान्यलक्ष्मीचे स्वागत उत्साहात केले जाते...

या सोहळ्यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल विभागप्रमुख मारुती भगत, पेण उपतालुका प्रमुख चेतन मोकल, तसेच उपकार खोत, राजू शेणवेकर, सुनील घरत, राजेश काठे, बाळू वर्तक, अल्पेश ठाकूर यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

मातोश्रीवरील हा पारंपरिक सोहळा केवळ निसर्गपूजन नव्हे, तर शिवसैनिकांच्या श्रद्धा, निष्ठा आणि संस्कारांचा जीवंत आविष्कार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मातोश्रीच्या प्रांगणात नवअन्नाचा सुगंध, भक्तिभावाची झलक आणि शिवसेनेचा अभिमान एकवटला — “मातोश्री” ही फक्त वास्तू नसून, ती परंपरेचा, संस्कारांचा आणि जनभावनेचा पवित्र केंद्रबिंदू आहे, हे पुन्हा एकदा या सोहळ्याने अधोरेखित केले....

Post a Comment

Previous Post Next Post