महाराष्ट्र वेदभुमी

माणगावच्या मयूरेश बापट यांनी साकारला आकर्षक मानगड किल्ल्याचा दिवाळी किल्ला

माणगाव :- (नरेश पाटील)  रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात तरुण मयूरेश बापट यांनी यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने ऐतिहासिक मानगड किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण किल्ला त्यांनी एकट्याने, कोणाच्याही मदतीशिवाय बनवला असून, त्यांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे...

मयूरेश सांगतात, “मी जवळपास गेल्या १५ वर्षांपासून दिवाळी किल्ले बनवत आहे. आतापर्यंत मी रायगड, पन्हाळा, प्रतापगड, पावनखिंड अशा अनेक ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. याच परंपरेला पुढे नेत यावर्षी मी किल्ले मानगडाची प्रतिकृती तयार केली आहे.”

हा किल्ला तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागला असून पुठ्ठा, माती, विटा, दगड यांसारख्या साहित्यांचा वापर करून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे. किल्ल्याभोवती उभे केलेले शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे हालते पुतळे हे विशेष आकर्षण ठरत आहेत. या सुंदर किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिक, पाहुणे आणि प्रवासी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत...

मानगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचा उपदुर्ग म्हणजेच किल्ले मानगड. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला स्थित असून, माणगाव तालुक्याला “माणगड” या गडाच्या नावावरूनच ओळख मिळाल्याचे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांमध्ये मानगड किल्ल्याचाही समावेश आहे...

पुंदरच्या प्रसिद्ध तहामधील तेवीस किल्ल्यांमध्ये मानगडाचा समावेश होतो. जंजिऱ्यातील सिद्धीच्या हल्ल्यांपासून श्रीमान रायगडाचा बचाव करण्यासाठी शिवरायांनी जी संरक्षण साखळी उभारली, त्यात दंडाराजपुरी, घोसाळगड, तळागड, मानगड, धन्वीचे शिखर, सोनगड, चांभारगड आणि लिंगाणा यांचा समावेश होता...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाची गडदेवता इंजाई (विंझाई) होय. चौल बंदर ते सातवाहनांची राजधानी जुन्नरकडे जाणाऱ्या प्राचीन कुंभे घाट व्यापारमार्गाचा राखणदार आणि टेहळणी गड म्हणून मानगडाचे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे...

आजही मानगडावर १२ पाणीटाके, महादरवाजा, बुरुज, गुप्त दरवाजा, राजसदर, हवालदारांच्या घराचे जोते, हनुमानशिल्प, शिवमंदिर, लेणी व निशाणीचा बुरुज असे ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात...

मयूरेश यांच्या कल्पकतेमुळे या दिवाळीत माणगावमध्ये इतिहास आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. सदर देखावा स्वतः मयुरेश यांनी त्याचा निवास स्थान, सरलादेवी मंगल कार्यालय शेजारी येते अंगणात बनविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post