सोगाव - अब्दुल सोगावकर : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील डेव्हिड इंग्लिश मिडियम स्कुलच्या स्काऊट्स आणि गाईड्स यांनी बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी किहीम समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत किहीम समुद्रकिनारा स्वच्छ केला.
यामध्ये सरखेल कान्होजी आंग्रे युनिटच्या ३७ स्काऊट्स, आणि हिरकणी युनिटच्या ३६ गाईड्स तसेच युनिट लीडर्स यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे केवळ किनारा स्वच्छ झाला नाही, तर समुद्री जीवसृष्टीचे संरक्षण आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण राखण्याचे महत्त्व याबद्दल जनजागृतीही निर्माण केली आहे. शिस्त, संघभावना आणि समर्पण यांच्या जोरावर ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आलेला सर्व कचरा गोळा करून किहीम ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी स्कूल प्रिन्सिपल शर्मिला खामकर मॅडम, जिल्हा संघटक सोनाली राठोड मॅडम यांच्या कडून सहकार्य करण्यात आले. स्काऊट युनिट लीडर प्रशांत भगत, दिनेश म्हात्रे, गाईड कॅप्टन सारिका म्हात्रे आणि नेहा कांबळे यांनी नियोजन केले. सदर उपक्रमासाठी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्काऊट आणि गाईड यांनी असा उपक्रम दरवर्षी आयोजित करून त्यात सहभाग घेण्याचे मान्य केले.
फोटो लाईन :आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त किहीम येथे स्काऊट्स आणि गाईड्स तर्फे स्वच्छता मोहीम करताना,
