महाराष्ट्र वेदभुमी

“गावाकडे चला, बाप्पा येतोय! — एन.एच.–६६ वर पी.आय. बोहाडे यांची सुरक्षित प्रवासाची हमी”

माणगाव :– (नरेश पाटील): गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस अगदी दाराशी आला आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”चा गजर आता “स्वागत बाप्पाचे” अशा मंगलमय आरोळ्यांमध्ये बदलला आहे. कोकणच्या मातीत आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविक मुंबई–पुण्यासारख्या महानगरांतून गावाकडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत...

या भाविकांच्या ओढीने मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.–६६) वर वाहनांचा महापूर उसळला असला तरी, माणगावात पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे वाहतुकीचा प्रवास सुरळीत सुरू आहे. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोहाडे यांनी सांगितले की, “भाविकांचा प्रवास आनंददायी आणि सुखरूप व्हावा हेच आमचे ध्येय असून त्यासाठी दिवस–रात्र प्रयत्न सुरू आहेत.”

आंचल दलाल मॅडम (पोलीस अधीक्षक) आणि पुष्कराज सूर्यवंशी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटना, होमगार्ड, वॉर्डन्स व स्वयंसेवक अशी एकत्रित टीम भाविकांच्या सेवेकरिता सज्ज आहे...

बोहाडे यांनी पुढे सांगितले,“गेल्या तीन दिवसांत आम्ही वाहतुकीचा प्रवाह अखंड ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण आज, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे. उद्या गणेश चतुर्थीला बाजारपेठेत व गावी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असली तरी आमचा संपूर्ण बंदोबस्त तयार आहे. व्यापारी संघटनाही आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहेत.”

भाविकांच्या आभाराला प्रतिसाद देताना बोहाडे म्हणाले,“माणगाव पोलिस हे फक्त एक निमित्त आहेत. या यशाचे खरे श्रेय पोलीस अधीक्षक आंचल मॅडम यांच्या सूक्ष्म नियोजनाला, महामार्ग पोलिसांच्या सहकार्याला, तसेच सर्व शासकीय व स्थानिक घटकांच्या एकत्रित प्रयत्नांना जाते. हे खरंच टीमवर्क आहे.”

शेवटी, गावाकडे धाव घेणाऱ्या भाविकांना त्यांनी एक आपुलकीचा संदेश दिला :

“तुम्ही निर्धास्तपणे बाप्पाचे स्वागत करायला गावी जा. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहोत. सुखरूप घरी पोहोचा, आनंदाने गणेशोत्सव साजरा करा. कुठल्याही प्रकारची चिंता करू नका — आम्ही तुमच्यासाठी सदैव सज्ज आहोत. गणपती बाप्पा मोरया!”

Post a Comment

Previous Post Next Post