महाराष्ट्र वेदभुमी

दक्षिण रायगडात खळबळ! राजीव साबळे प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानदेव पोवार’ काय चालवत आहेत राजकीय डाव?

माणगाव :- (नरेश पाटील) रायगडच्या राजकीय पटावर सध्या जणू काही वादळापूर्वीची शांतता आहे! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गजांच्या हालचालींनी जिल्ह्यात कमालीचं औत्सुक्य निर्माण केलं आहे...यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली घडामोड म्हणजे माजी आमदार स्व. अशोक साबळे यांचे सुपुत्र अ‍ॅड. राजीव साबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील अपेक्षित प्रवेश येत्या शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा औपचारिक प्रवेश माणगावात होणार आहे...

पण खरी खळबळ उडवणारी आणि राजकीय वर्तुळात शह-कटशहाचे पेच निर्माण करणारी चर्चा एका सुस्पष्टपणे शांत असलेल्या पण राजकीय गोटात कायम ‘गडबड’ माजवणाऱ्या नेत्याभोवती फिरते—दक्षिण रायगडचे ज्येष्ठ नेता, नगरसेवक ज्ञानदेव पोवार."ग्रामीण भागाचा शिल्पकार" अशी ओळख लाभलेले पोवार, माणगाव नगरपंचायतीच्या प्रभाग १६ चे सध्या नगरसेवक असले तरी त्यांची खरी ओळख ही राजकीय समीकरणं बदलणाऱ्या 'किंगमेकर' म्हणून आहे... काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन नगराध्यक्षपद गाठणारे कोकणातील एकमेव नेते, परंतु ते पद स्वीकारण्याआधीच शिवसेनेत वळलेले, आणि तिथून थेट राष्ट्रवादीच्या वर्चस्वावर घणाघात करणारे... त्यावेळेस पोवारांनी खासदार सुनील तटकरे यांच्या गडातच आघाडी उभी करत त्यांना स्थानिक राजकारणात मोठं आव्हान दिलं होतं...

आज त्या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटात राजीव साबळे यांचा प्रवेश होतो आहे आणि तटकरे यांच्या उपस्थितीत होतो आहे — अशा वेळी पोवार काय भूमिका घेणार, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही...विशेष म्हणजे, पोवार सध्या कोणत्या पक्षात आहेत यावरही धुकं आहे... त्यांच्या भूमिकेबद्दल विचारल्यावर त्यांनी केवळ, “बातमी आधी खात्रीशीर होऊ द्या, मग मी माझी भूमिका स्पष्ट करीन,” एवढेच म्हटल्याने या गूढतेला आणखी खतपाणी मिळाले आहे...

यामध्ये अजून एक महत्त्वाचा धक्का म्हणजे, महाडचे आमदार व मंत्री भरतशेत गोगावले यांनी नुकतीच पोवार यांच्या निवासस्थानी दिलेली खासगी भेट. ही भेट कुणाच्या लक्षात न येईल इतक्या संयमाने झाली असली, तरी स्थानिक राजकीय भट्टीत ही ठिणगी पुरेशी आहे नवा भूकंप घडवायला...

सर्व घडामोडी लक्षात घेतल्यास, राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश केवळ एका व्यक्तीचा प्रवेश नसून तो दक्षिण रायगडात सत्तांतराचा ट्रिगर ठरू शकतो... आणि या सर्व नाट्यात ज्ञानदेव पोवार हे राजकीय डाव आखणाऱ्या गूढ 'शतरंजी महारथी'प्रमाणे उदयाला येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत... आता प्रश्न एकच — पोवार खरोखरच अलिप्त राहणार की, नेहमीप्रमाणे निर्णायक थेट चाल टाकणार?

जिल्हा सध्या एका मोठ्या राजकीय ट्विस्टच्या उंबरठ्यावर उभा आहे!

Post a Comment

Previous Post Next Post