राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चोरबाहुली परिसरातील घटना
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वरील चोरबाहुली शिवारातील रेती भरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याचा बाजूला असणाऱ्या गुराखी व गाईला जोरदार धडक दिल्यामुळे गुराखी व गाय जागीच ठार झाले. ही घटना (दि.३) ला सायंकाळच्या ६.०० वाजताच्या सुमारास घडली. कालु असे मृतक गुराख्याचे नाव आहे. प्राप्त माहीतीनुसार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ चोरबाहुली शिवारात हा दुर्दैवी अपघात झाला. नागपूर दिशेने एमएच/४० सीएम/५७६५ रेती भरून भरधाव वेगाने जात असलेल्या चोरबाहुली येथील यादव यांच्या कडे कालू (टोपण नाव) हा गुराखी म्हूणन काम करायचा. जंगलातून जनावरे चारून सायंकाळचा सुमारास घराकडे जात असतांना अचानक महामार्गावर रस्त्यावर एक गाय आली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचालकास गाय दिसताच तिला वाचविण्याच्या नादात भरधाव ट्रकने गाईला जोरदार धडक देत महामार्गाचा रस्त्याचा बाजूला उभा असलेल्या गुराखीला चिरडून रस्त्याचा बाजूला ट्रक कोसळून पलटी झाला. या अपघातात गुराखी व गाय जागीच ठार झाले. चोरबाहुलीचे पोलीस पाटील योगेश कंगाली यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. देवलापार पोलिसांनी पंचनामा करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. ट्रकचालक आरिफ खान (३०) व कंडक्टर सोहेल खान (२१) या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. कंडक्टरला उपचारासाठी मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. रामटेक पोलीस पुढील तपास करीत आहेत...
महामार्ग पोलिसांकडून व्हावी कारवाई
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांच्या संचार असल्याचे नेहमीच बघावयास मिळत असते... याच मोकाट जनावरांमुळेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसून येते. या सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून जनावरांना मोकाट सोडणाऱ्या पशुपालकांवर महामार्ग पोलिसांकडून कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे...
