महाराष्ट्र वेदभुमी

भयमुक्त रस्त्यासाठी दूरशेत ग्रामस्थ करणार १७ जुलैला जलसमाधी आंदोलन..!

रस्ता भयमुक्त करण्याचा पुन्हा एकदा एल्गार..

कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभुमी

पेण-: दि.१५ : पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याच्या परिसरतील बेलवडे आणि मुंगोशी हद्दीतील दगडखाणी आणि क्रशर प्लांटमधून निर्माण होणाऱ्या मालाची ओव्हरलोडेड अवजड वाहनाने दुरशेत रस्त्यावरून दिवसाला सुमारे ३००-४०० ओव्हरलोडेड डंपर चालत असताना या रस्त्यावर दुरशेततकरांचे चालणे मात्र जिकिरीचे झाले आहे... भरधाव येणारे ओव्हरलोडेड डंपरने अनेक वेळा येथील स्थानिक पादचारी व बाईक स्वरांना धडक देऊन अपघात झाले आहेत. त्याचबरोबर धूळ आणि चिखलामुळे दुरशेत मधील ग्रामस्थांचे जगणं मुश्किल झालेले असताना या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत वारंवार प्रशासनाकडेत मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अखेर दुरशेत ग्रामस्थांनी दि. १७ जून २०२५ रोजी दुरशेत फाट्यावर अवजड वाहनांसाठी रास्ता रोको आंदोलन केले... सदर आंदोलनाच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहून मा. तहसिलदार साहेब पेण यांनी ज्यांच्यामुळे दुरशेत रस्त्यावर अवजड वाहन वाहतूक होते असे खाणमालक आणि दुरशेत ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा करून ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या आणि तसे लेखी पत्रही ग्रामस्थांना देण्यात आले आहे... प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे दुरशेत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले...

मा. तहसिलदार साहेब यांनी उपविभागीय अधिकारी पेण यांच्या कार्यालयात मा. आमदार श्री. रविशेठ पाटील आणि मा. उपविभागीय अधिकारी पेण यांच्या उपस्थितीत गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी दुरशेत ग्रामस्थ प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती... त्या बैठकीतही स्वतः आमदार साहेबांनी ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून लवकरच पर्यायी रस्ता तयार करण्यात येईल असे सांगितले. परंतु मा. तहसिलदार साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य असलेल्या लेखी पत्रातील तरतुदींचे पालन खाणमालक यांच्याकडून करण्यात आले नाही... उलट उल्लंघन करण्यात आले... तसेच खाणमालकांनी अंधार्‍या रात्रीचा फायदा घेऊन ३ जुलै २०२५ रोजी रात्री ९.०० वाजता कोणालाही कसलीही पुर्वसुचना न  देता आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता जे.एस.डब्ल्यु. कंपनीतील स्लॅग बाळगंगा नदीपात्रात टाकून, भराव करुन अनधिकृतपणे रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला... जर भराव होऊन रस्ता तयार झाला तर आधीच पुरग्रस्त असलेल्या दुरशेत गावाला पुराचा फटका बसून गाव नेहमीच पाण्याखाली जाणार आहे. पुराच्या पाण्यामुळे दरवर्षी दुरशेत गावातील अनेक घरे पाण्याखाली जातात... त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते तसेच पुरांच्या पाण्यामुळे दरवर्षी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर दुरशेत हे गाव दरडग्रस्त असून तीन-चार वेळा गावावर दरड कोसळली आहे... नदीपात्रात भराव टाकून जर रस्ता तयार झाला तर भविष्यात पुराच्या पाण्याचा  फक्त दुरशेत गावाला धोका निर्माण होणार नाही तर नदीच्या बाजूला असलेल्या खरोशी, बळवली आणि जिते गावाला सुद्धा पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होणार आहे... मा. तहसिलदार साहेब पेण यांच्या पत्रात अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मुदत १५ दिवस म्हणजेच दि. २ जुलै २०२५ रोजी संपली असताना देखील पर्यायी रस्ता तयार करण्यात आला नाही... तरीही दुरशेत ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करत अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मुदत  दि. १० जुलै २०२५ पर्यंत दिली आहे... वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने दुरशेत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न करणार्‍या प्रशासनाविरोधात आणि नदीपात्रात रस्ता तयार करून आमचे दुरशेत गाव पाण्याखाली बुडविण्याच्या निर्णयाविरोधात तसेच भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दुरशेत ग्रामस्थ दुरशेत फाट्यावर बाळगंगा नदीपात्रात १७/०७/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सामुहीक जलसमाधी घेऊन आंदोलन करणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post