अलिबाग : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील झुंझार मैदानाजवळील नवेनगर फाट्याच्या मार्गावर असह्य घाणीमुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आलेय... या परिसरात उभारण्यात आलेले डंपिंग ग्राउंड हे रा.जि.प. शाळेच्या अगदी शेजारी असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सातत्याने बिघडतय...
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय... नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे... चायनीज दुकानातील उरलेले पदार्थ, कोंबड्यांची पिसं, बाजारातील सडलेला भाजीपाला व घाण सगळं बेधडकपणे रस्त्यावर टाकलं जातय... यामुळे अर्धा रस्ता कचऱ्याने व्यापला असून वाहतूक खोळंबते,अपघातही वाढले आहेत...
या दुर्गंधीयुक्त कचऱ्यावर भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले असून, प्रवास करताना वाहनांच्या समोर कुत्रे धावत असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत... पावसात खड्डे पाण्याने भरल्याने ते नजरेसही पडत नाहीत परिणामी वाहनचालक सरळ त्या खड्ड्यांत पडतात...
डंपिंग ग्राउंडमुळे आजूबाजूच्या परिसरात डासांचे प्रमाणही प्रचंड वाढलेय.... कोणत्याही प्रकारची फवारणी अथवा जंतुनाशकाची उपाययोजना न झाल्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढलाय...
स्थानिक प्रशासनाला विनंती नाही, तर आता इशारा आहे–
या असह्य परिस्थितीपासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून डंपिंग ग्राउंड दुसऱ्या ठिकाणी हलवावे, नियमित साफसफाई व फवारणी करावी आणि रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केलीय...
