माणगाव :- (नरेश पाटील): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील माणगाव मोर्बा रोड कोपऱ्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, हे ठिकाण वाहनांसाठी एक प्रकारचा सापळा ठरत आहे... एकेरी आणि अरुंद वळणामुळे १६ ते २४ चाकी मोठ्या वाहनांना वळणे कठीण जाते, त्यामुळे ट्रॉली, कंटेनर, सिलेंडर गाडी एस.टी. महामंडळाच्या लांब आसन क्षमतेच्या बसेस तसेच खाजगी लक्झरी कोचेसना देखील अडथळ्यांचा सामना करावा लागतो... विशेषतः जड खनिज वाहतूक करणारी वाहने श्रीवर्धनकडे वळताना किंवा गोवा/मुंबईकडे जाण्याच्या प्रयत्नात अडकतात आणि संपूर्ण वाहतूक ठप्प होते.... शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी प्रवासी वाहतुकीची तीव्रता अधिक असल्याने ही समस्या आणखीनच बिकट होते... याबाबत माणगाव नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, मोठ्या वाहनांचे चाके रस्त्यात अडकतात, अपघाताचे प्रमाण वाढते, पादचाऱ्यांसह दुचाकीस्वार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वाहन अडकले की मागे लागलेल्या वाहनांमुळे रिव्हर्स घेणे अशक्य होते, गोंधळ, अचानक ब्रेकिंग आणि किरकोळ अपघात घडतात.., अशा वेळी स्थानिक दुकानदार किंवा प्रवासीच पुढे येऊन ड्रायव्हरला दिशा दाखवतात आणि वाहतूक सुरळीत करतात. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे ११ जून २०२५ रोजी रात्री ८:३३ वाजता २४ चाकी रिकामी ट्रॉली वाहन श्रीवर्धन रोडवरून गोवाच्या दिशेने जाताना वळणावर अडकले होते... तेव्हा 'जलाल' नावाच्या युवकाने प्रसंगावधान राखून हस्तक्षेप केला आणि वाहन सुखरूप मार्गावर आणले... अशा घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांची रोजची गैरसोय वाढत असून, याकडे महामार्ग प्राधिकरणाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे... त्वरित रस्ता रुंदीकरण, मार्गदर्शक फलकांची उभारणी, वळणाचा सुयोग्य फेरआकार किंवा पर्यायी मार्ग तयार करणं गरजेचं आहे... अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका नाकारता येणार नाही.. ही समस्या केवळ वाहतुकीची नसून, ती स्थानिक विकास, सुरक्षितता आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा कस पाहणारी ठरत आहे...
