बोया’ प्रकरणातून उघड झालं धक्कादायक सत्य – 1000 हून अधिक बोटी अनधिकृत
अलिबाग : मुरुड-कोर्लई समुद्रकिनाऱ्यावर ६ जुलै रोजी आढळलेल्या संशयास्पद ‘Muqadar Boya 99’ या बोटीसदृश वस्तूमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती... प्रथमदर्शनी ती बोट पाकिस्तानातून आलेली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता... मात्र, तपासाअंती ती बोट नसून ‘AIS ट्रान्सपोंडर’द्वारे नियंत्रणात असलेली एक बोया असल्याचे स्पष्ट झाले आहे...
तथापि, या प्रकरणाच्या तपासात अजूनही अधिक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे — रायगड जिल्ह्यात 1000 हून अधिक बोटी अनधिकृतरीत्या कार्यरत असून, त्यांची कोणतीही अधिकृत नोंदणी झालेली नाही...
रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितले की, "बोटींची कायदेशीर नोंदणी ही अत्यावश्यक असून, सागरी सुरक्षेसाठी तसेच आपत्कालीन प्रसंगी मदतकार्य सुलभ करण्यासाठी ती अनिवार्य आहे... परंतु, या अनधिकृत बोटींमुळे सुरक्षा यंत्रणा धोक्यात येत आहे..."
कोर्लई किल्ल्याजवळ सापडलेली बोया अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही... ती शोधण्यासाठी पोलीस आणि शासकीय यंत्रणांकडून सघन शोध मोहीम राबवली जात आहे... ही घटना केवळ सुरक्षा नव्हे, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे...
मत्स्य व्यवसाय आयुक्त व सहआयुक्तांना याची माहिती देण्यात आली असून, संबंधित बोटींवर कठोर कारवाईचे निर्देश जारी करण्यात आले आहेत...
