महाराष्ट्र वेदभुमी

वड्डी येथे मंदिरातील मूर्तीचे तोंड फिरल्याची अफवा; अफवा पसरवणाऱ्याविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा .

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

सांगली - दि.३० : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी या गावातील मरगूबाई मंदिरातील देवीच्या मूर्तीचे तोंड पूर्वेकडून ईशान्येकडे आपोआप फिरल्याचा चमत्कार झाला आहे अशा स्वरूपाच्या बातम्या कालपासून सोशल मीडियामध्ये येत आहेत... 

महाराष्ट्रात 2013 साली जादूटोणाविरोधी कायदा अंमलात आला आहे... या कायद्याच्या अनुसूची दोन १(ख) नुसार 'कोणत्याही चमत्काराचा दावा करणे आणि त्या चमत्काराचा प्रचार प्रसार करून फसवणूक करणे ठकवणे हा दखलपात्र गुन्हा आहे...

वड्डी गाव मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करण्याचे आदेश मा.पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनचे फौजदार हे जादूटोणाविरोधी कायद्याचे दक्षता अधिकारी आहेत... आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या अंधश्रद्धांच्या बद्दल त्यांनी प्रतिबंध करणे आवश्यक आहे, तेव्हा सांगली पोलीस दलाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विनंती आहे की, असा चमत्कार जर मंदिरात घडल्याचा दावा मंदिर प्रशासन, पुजारी करत असतील तर त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत त्वरित गुन्हा दाखल करावा. 

खरे तर 'कोणत्याही वस्तूला बल लावल्याशिवाय त्या वस्तूची दिशा बदलत नाही' हा विज्ञानाचा एक साधा नियम शाळेत शिकवला जातो. विज्ञानाच्या नियमाविरुद्ध घडलेल्या घटनेला चमत्कार म्हणतात. पण हे सध्याच्या विज्ञान युगात अशक्य आहे. चमत्कार हे हात चलाखी करून किंवा विज्ञानाचे नियम गुपचूप वापरून केले जातात.'चमत्कारा शिवाय नमस्कार नाही' अशी समाजात रीत असल्याने मंदिराचे महात्म वाढवण्यासाठी अशा चमत्कारांचा आसरा घेतला जातो.

जनतेला अंनिसचे असे आवाहन आहे की, असे चमत्कार जगात घडत नाहीत. प्रत्येक चमत्कारामागे काहीतरी कारण असते आणि ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते. 

आपल्या वारकरी संतांनी चमत्कारांना नाकारले आहे.

चमत्काराच्या भरी भरोनी ।

झाली अनेकांची धुळधानी ।।

संत चमत्कार यापुढे ।

कोणी नका वर्णू सज्जना हो ।। - तुकडोजी महाराज

आजही गावोगावी कुणी तरी दैवी अवतार असल्याचे सांगून चमत्कार केल्याचे वा घडल्याची अफवा पसरते... त्यावेळी लोकांचा मेंदू ठिकाणावर आणण्यासाठी संत तुकडोजी महाराजांची ही रचना खूपच उपयोगी येते. चमत्काराच्या नादी लागून अनेकांचे नुकसान झाले... त्यामुळे समाजातील सज्जन लोकांनी, संत चमत्कार करतात, असे अजिबात कुणाला सांगू नये  आणि त्या चमत्काराच्या नादीही कुणी लागू नये, असा इशारा तुकडोजी महाराज देतात...

वास्तविक संत नव्हे जादुगार । करावया चमत्कार । 

हा तों चालत आहे व्यवहार । पोटभर्‍यांचा ॥

- संत तुकाराम महाराज 

चमत्काराची अफवा पसरवणे हा पोटभऱ्यांचा धंदा आहे असे संत तुकाराम महाराज आपले अभंगातून ठणकावतात...जनतेने वारकरी संतांचे हे पुरोगामी विचार आत्मसात करून अशा चमत्कारांच्या भाकड कथा पासून दूर राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, आशा धनाले, त्रिशला शहा, डॉ.सविता अक्कोळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post