अलिबाग (प्रतिनिधी) – एड्सविषयक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी, जिल्हा एड्स निवारण व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग आणि पी.एन.पी. कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेड रिबीन क्लब नोडल अधिकारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा’ मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली...
कार्यशाळेचे उद्घाटन प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. विक्रांत वार्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले... कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील रेड रिबीन क्लबचे नोडल अधिकारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे श्री. संजय माने यांनी HIV/AIDS विषयक जनजागृतीसंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण व सखोल माहिती उपस्थितांना दिली...
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. टी.पी. मोकल, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण गायकवाड आणि प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनीही आपल्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले...
पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रवींद्र पाटील यांनी रेड रिबीन क्लबची संकल्पना, उद्दिष्टे आणि युवांमध्ये याची गरज यावर सखोल विवेचन केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी अध्यक्षीय भाषणातून कार्यशाळेचे महत्व अधोरेखित केले...
कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्री. रवींद्र कदम, सौ. संपदा मलेकर, श्री. रूपेश पाटील, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, क्रीडा अधिकारी प्रा. तेजेश म्हात्रे, प्रा. श्वेतल झिंजे व प्रा. कपिल जोशी यांची विशेष उपस्थिती होती...
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन NSS कार्यक्रमाधिकारी व रेड रिबीन क्लबचे नोडल अधिकारी प्रा. दिनेश पाटील यांनी केले...
सदर कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरावर रेड रिबीन क्लब अधिक सक्षमपणे सक्रिय होण्यास प्रोत्साहन मिळाले असून, युवा पिढीमध्ये एड्सबाबत सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरला आहे...
