महाराष्ट्र वेदभुमी

"शाश्वत मत्स्यपालनाच्या दिशेने ठाम पाऊल!"

मत्स्य शेतकरी दिनानिमित्त गोवेत मार्गदर्शन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद"

माणगाव प्रतिनिधी :- (नरेश पाटील): राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त मत्स्यपालन क्षेत्राला दिशा देणारा आणि शाश्वततेकडे वाटचाल करणारा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम गोवे (ता. रोहा) येथील हॅन्स ॲक्वाकल्चर येथे संपन्न झाला... हा स्तुत्य उपक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. मनोज तलाठी होते... यावेळी प्रगतशील मत्स्यशेतकरी हसन म्हसलई यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून मत्स्यपालनातील महत्त्वाच्या बाबींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी योग्य खाद्य व्यवस्थापन, तंत्रशुद्ध पद्धती, आणि पारंपरिक शेतीपेक्षा अधिक उत्पादनक्षम पर्यायांविषयी प्रत्यक्ष अनुभवातून दिलेल्या माहितीने उपस्थित शेतकऱ्यांना नवे दृष्टिकोन दिले...

डॉ. तलाठी यांनी अध्यक्षीय भाषणात मत्स्य व्यवसायाची जागतिक गरज आणि भारतात या क्षेत्रात झालेल्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा घेतला... त्यांनी भारताच्या मत्स्यबीज निर्मितीचे जनक डॉ. हिरालाल चौधरी यांचे कार्य अधोरेखित करत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १० जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जात असल्याचे सांगितले...

कार्यक्रमात डॉ. मांडवकर, डॉ. आरेकर आणि डॉ. कार्ले यांचीही उपस्थिती लाभली होती... डॉ. आरेकर यांनी दिनाच्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्वाचे विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मांडवकर यांनी केले...

दुपारच्या सत्रात सहभागी शेतकऱ्यांनी हसनभाई यांच्या मत्स्य युनिट व पपई प्रकल्पाला भेट देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले आणि आपले अनेक प्रश्न मांडले... या संवादात्मक भेटीत शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले...

कार्यक्रमाच्या समारोपात विद्यापीठाच्या विविध प्रकाशनांचे वाटप करण्यात आले, तसेच हसन म्हसलई यांचा त्यांच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला... डॉ. कार्ले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली...

हा कार्यक्रम मत्स्य व्यवसायात नवसंजीवनी देणारा ठरला असून, शाश्वत उत्पादनासाठी नवा दृष्टिकोन देणारी प्रेरणा ठरली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post