महाराष्ट्र वेदभुमी

खड्डे बुजवताना 'अलिबागकरांची' एकजूट –पण प्रशासन आहे कुठे?


अलिबाग : अलिबागमधील रस्त्यांवरील वाढते खड्डे ही केवळ वाहतुकीची समस्या नसून, ती जनतेच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न आहे... नागरिकांनी स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेणे ही बाब कौतुकास्पद आहे, पण त्याहून अधिक चिंताजनक म्हणजे हे काम प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांच्या अनुपस्थितीत घडते आहे, ही गोष्ट...

'अलिबागकर एक हात मदतीचा' या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी ज्या पद्धतीने ठोस कृती केली, ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे... मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपालिका, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होतो... विकासकामांसाठी निधी मंजूर होतो, निविदा काढल्या जातात, पण प्रत्यक्षात काम का होत नाही, हे कोडे कायमच आहे...

रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दरवर्षी अनेक अपघात होतात... मग एखादा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? रस्त्यांच्या देखभालीसाठी जबाबदार यंत्रणांनी तातडीने ठोस कृती करणे ही काळाची गरज आहे...

अखेर नागरिकांनी पावले उचलण्याऐवजी, त्यांचा पैसा आणि कर याच्या बदल्यात चांगली सुविधा मिळणे ही त्यांची प्राथमिक अपेक्षा असते – आणि ती पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, कृपादान नव्हे... रस्त्यांची डागडुजी ही जनतेला करावी लागते, ही बाब निश्चितच शासन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे...

Post a Comment

Previous Post Next Post