माणगाव :- (नरेश पाटील) शहरातील तीन बत्ती नाका परिसरात सोमवारी दोन जून रोजी रात्री साडे दहा च्या सुमारास खासगी बस व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे... या अपघाताचा धक्का अद्याप उतरलेला नसताना लक्षात येते की याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक युवक कंटेनरखाली चिरडून ठार झाला होता, आणि त्याच परिसरात तीन दिवसांपूर्वी एका आदिवासी महिलेलाही दुचाकीवरून पडून प्राण गमवावा लागला...
ही एक-एक करून घडणारी मृत्यूची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये, आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे रखडलेलं बायपासचं काम... या रस्त्यावर केवळ अपघातच नव्हे, तर नागरिकांच्या मनात कायम भीतीचं वातावरण निर्माण आहे...
जुना मुंबई-गोवा महामार्ग माणगाव शहरातून जात असल्यामुळे संपूर्ण शहरावर वाहतूक भार प्रचंड वाढला आहे... केवळ दोन पदरी रस्ता असलेल्या या महामार्गावर दररोज शेकडो ट्रक, बस, कार आणि दुचाकी वाहतूक करत असतात... वर्दळीच्या वेळेस एकाच रस्त्यावर तीन-तीन वाहने चालत असून, लहानशा शहराची वाहतुकीची क्षमता पार कोलमडून पडली आहे...
स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून बायपासच्या कामासाठी पाठपुरावा करत आहेत...सार्वजनिक बैठका, आंदोलने, निवेदने, सगळं करूनही महामार्ग प्राधिकरण, राज्य प्रशासन केवळ आश्वासनं देण्यापलीकडे काहीच करत नाही...
हे रखडलेले बायपासचे काम केवळ विकासाची अडचण नाही, तर आता थेट जीव घेणाऱ्या समस्येचे रूप घेत आहे... हे अपघात केवळ आकडे नाहीत, ते कोणाचं तरी आयुष्य हरवणारे, कुटुंब उद्ध्वस्त करणारे प्रसंग आहेत. मृतांचा आकडा वाढतोय, पण जबाबदारी मात्र कोणीही स्वीकारायला तयार नाही...
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव, निधी वितरणातील गोंधळ, आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतो आहे...
आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि रिक्षा, दुचाकीस्वार दिवसाढवळ्या देखील जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. शहरातील आरोग्य केंद्रांवर अपघातग्रस्तांची गर्दी वाढत आहे... पोलीस प्रशासन देखील तणावाखाली आहे...
बायपासचं काम तातडीने पूर्ण होणं ही आता काळाची गरज आहे, कारण जर असंच सुरू राहिलं, तर माणगाव शहर मृत्यूच्या सावटाखालीच अडकून पडेल...
राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आता कृतीशील निर्णय घेऊन नागरिकांच्या जिवांचा विचार करणे अत्यावश्यक आहे... अन्यथा प्रत्येक अपघात हा केवळ एक आकडा न राहता, जनतेच्या संतापाचा उद्रेक घडवणारा ठरेल...
