महाराष्ट्र वेदभुमी

असे सुशोभिकरण कोणाच्या कामाचे? कोलाड रेल्वे स्थानकास करोडो रुपये खर्च; रेल्वे स्थानकात एक पॅसेंजर गाडीशिवाय दुसरी गाडी नाही,

प्रवाशी वर्गातुन संतप्त प्रतिक्रिया,पनवेल ते वीर लोकल सुरु करण्याची मागणी 

 पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर) : सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे रायगड जिल्ह्यातील कोलाड व विर रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले...त्याचे उदघाटन ६ सप्टेंबर २०२४ रोजी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले... परंतु याच कोलाड स्थानकात फक्त दादर रत्नागिरी एकच पॅसेंजर गाडी थांबते तर  दुसरी गाडी दिवा सावंतवाडी कोरोना काळापासून बंद करण्यात आली आहे.. ती अद्याप सुरु न झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे हाल होतांना दिसत आहे.. मग हे  सुशोभिकरण कोणाच्या कामाचे?..अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत असुन वीर कोलाड ते पनवेल पर्यंत लोकल सुरु करण्याची मागणी केली जात आहे... 

  कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी १९७७ साली मधु दंडवते रेल्वे मंत्री असतांना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला... त्यावेळी ई. श्रीधरण यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु झाले यानंतर १९८९ ते १९९०मध्ये रेल्वे मंत्री जॉज फर्नाडीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली...कोकणचा विकास व्हावा यासाठी पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी कोकण रेल्वेसाठी दिल्या कोकण रेल्वे ही सुरु झाली... परंतु जेथे कोकण रेल्वे सुरु झाली त्या पहिल्याच स्टेशनला रोरो सेवा सुरु झाली व धनदांडग्यांचा प्रश्न सुटला परंतु सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी एकच गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे...

 कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असुन बाजूला कुंडलिका नदी, हिरवेगार निसर्ग, धबधबे सह्याद्रीची नयनरम्य पार्श्वभूमी यासाठी ओळखले जाणारे कोलाड तसेच कोलाड परिसरातील गोवे येथे असणारे श्रीमती गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कान्हाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात.. याच कॉलेजच्या बाजुने कोकण रेल्वे गेली आहे.. परंतु येथे कोणतेही लोकल सेवा सुरु नसल्याने विदयार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे...

   कोलाड परिसरात वाडया वस्त्या धरून ७१ गावाचा समावेश होतो...येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल कोलाड ते वीरपर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेल गृहिणी तसेच विद्यार्थी यांना पार्ट टाईम नोकरी ही करता येईल...तसेच कोलाडपासून पुणे हे नजिकचे ठिकाण असुन पुणे मार्गाकडे जाणाऱ्या लोकांचा ही फायदा होईल...सर्व बाबींचा विचार करता तसेच रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व तरुणांना रोजगारही मिळाले यामुळे दिवसातून तीन वेळा पनवेल कोलाड ते वीरपर्यंत लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी प्रवाशीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post