महाराष्ट्र वेदभुमी

अपात्रता, निकष डावलून राजकीय संबंधांमुळे महापालिकामध्ये बेकायदा बढती

शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला संतोष जाधव यांचे नोटीसद्वारे आव्हान.

उरण दि २६(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई महापालिका शहर अभियंता शिरीष गंगाधरराव आरदवाड यांना स्पष्ट अपात्रता असूनही कायदेशीर तरतुदी आणि सरकारी आदेशांचे, सेवा नियमांचे उल्लंघन करुन बेकायदेशीर बढती देण्यात आली असून, शिरीष आरदवाड यांना महापालिका मध्ये देण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या, पदोन्नती आणि अतिरिक्त शुल्काची सखोल, निष्पक्ष आणि कालबध्द चौकशी तात्काळ सुरु करा, विहित सेवा नियम आणि सरकारी अधिसूचनांनुसार त्यांची पात्रता पडताळून पहा, अशी मागणी करणारी नोटीस नवी मुंबई मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष श्रीमंत जाधव यांनी वकिलामार्फत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि महापालिका आयुक्त यांना पाठविली आहे. नोटीस मिळाल्यापासून निर्धारित वेळेत समाधानकारक कारवाई केली गेली नाही, १५ दिवसांच्या आत या नोटीसीला प्रतिसाद म्हणून केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दिला नाही तर उच्च न्यायालय किंवा इतर सक्षम मंचांसमोर धाव घेण्यासह सर्व उपलब्ध कायदेशीर उपायांचा अवलंब माझे अशिल संतोष   जाधव करतील, असे त्यांच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस मध्ये नमूद केले आहे.

       महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) महाव्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी, अतिरिक्त शहर अभियंता, अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि सध्या शहर अभियंता या पदांवर शिरीष आरदवाड बेकायदेशीर आणि मनमानीपणे नियुक्ती आणि बढती देण्यात आली आहे.

१६ डिसेंबर १९९५ रोजी जाहिरातीनुसार आणि उमेदवाराच्या अर्जावरुन शिरीष आरदवाड यांची नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून निवड झाली. या पदासाठी किमान चार वर्षाचा अनुभव आवश्यक असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. मात्र, शिरीष आरदवाड यांनी १९९४ मध्ये अभियांत्रिकी पदवी (मेकॅनिकल) प्राप्त केल्यानंतर, १९९५ मध्ये त्यांची कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती झाली. शिरीष आरदवाड यांना पदवी पूर्ण झाल्यापासून नियुक्तीच्या तारखेपर्यत फक्त एक वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे सदर पदासाठी आवश्यक असलेल्या चार वर्षाच्या अनुभवा पेक्षा तीन वर्षाचा अनुभव कमी असल्याने १९९५ मध्ये शिरीष आरदवाड यांची नियुक्ती अनियमित आणि या पदासाठी निर्धारित पात्रता निकषांच्या विरुध्द होती. त्यानंतर २८ डिसेंबर २०१२ रोजी शिरीष आरदवाड यांना पदोन्नती देऊन खुल्या प्रवर्गातून कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती  झाल्यावर पदासाठी पात्र नसतानाही राजकीय संबंध आणि स्वार्थामुळे शिरीष आरदवाड यांना एनएमएमटी महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. एनएमएमटी महाव्यवस्थापक पात्रतेच्या निकषांमध्ये अधिकारी सरकारचा वर्ग - १ अधिकारी असावा आणि सदर पद प्रतिनियुक्तीने भरले जावे असे नमूद असूनही, शिरीष आरदवाड यांनी एनएमएमटी महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार अखंडपणे सांभाळला आहे...

        ४ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सर्व नियम, कायदे आणि पात्रता निकषांचे उल्लंघन करुन शिरीष आरदवाड यांना महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या पात्रतेच्या निकषांनुसार, महापालिका उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदावर तीन वर्षे पूर्ण केलेली किंवा उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदावर इतर कोणत्याही सरकारी संस्थेत ३ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती प्रतिनियुक्तीवर असणे आवश्यक आहे. मात्र,  स्थापित सेवा नियम, पात्रता निकष आणि योग्य प्रक्रियेकडे दुर्लक्ष करुन महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी पदी शिरीष आरदवाड यांना नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर शिरीष आरदवाड यांच्या अर्जानुसार २३ ऑगस्ट २०२१ रोजी महापालिका प्रशासक/आयुक्तांनी पात्रता निकषांना बाजूला ठेवून त्यांची प्रतिनियुक्ती पध्दतीने अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केला. सदर ठरावानुसार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अतिरिक्त शहर अभियंता पदाच्या सेवा नियमांच्या आणि पात्रतेच्या निकषांच्या विरुध्द असतानाही शिरीष आरदवाड यांची महापालिका प्रशासनात अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) पदी नियुक्ती करण्याचा आदेश मंजूर केला...

अतिरिक्त शहर अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर ६ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिरीष आरदवाड यांच्या पूर्वीच्या सेवांचा महापालिका मध्ये सेवाज्येष्ठता गणनेसाठी समावेश केला आहे.  पुढे २० डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कार्यकारी अभियंता (यांत्रिक) या नवीन पदाच्या मंजुरीचा आणि या पदावर शिरीष आरदवाड यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठवला. या प्रस्तावाला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. त्यानंतर २७ सप्टेंबर २०२३ रोजी महापालिका आयुक्तांनी शिरीष गंगाधरराव आरदवाड यांची अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) या पदावर नियुक्ती करण्याचा आदेश पारित केला...

१४ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिरीष आरदवाड यांची ”पदोन्नती” वर अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी त्यांना कार्यकारी अभियंता यांत्रिक श्रेणीमध्ये ज्येष्ठता आहे, असा दावा महापालिका आयुक्तांनी केला. महापालिका आयुक्तांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी एक ज्येष्ठता यादी प्रकाशित केली. या यादीमध्ये कार्यकारी अभियंता (यांत्रिक) श्रेणीमध्ये पहिल्या क्रमांकावर सुधीर जांभवडेकर प्रथम तर शिरीष आरदवाड ज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी  शिरीष आरदवाड यांना त्यांच्या श्रेणीत ज्येष्ठता असल्याचा केलेला दावा स्पष्टपणे दिशाभूल करणारा ठरला आहे...

       २० मार्च २०२४ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिरीष आरदवाड यांना अतिरिक्त आयुक्त (२) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवणारा आदेश जारी केला. सदर आदेश जारी करण्याच्या वेळी, शिरीष आरदवाड यांनी एनएमएमसी मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) या पदांचा अतिरिक्त कार्यभार एकाच वेळी सांभाळला होता. महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर स्थापित पात्रता निकषांनुसार शिरीष आरदवाड यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती, असे स्पष्ट झाले आहे...

 त्यानंतर ३१ मे २०२४ रोजी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी महापालिका शहर अभियंता पदावर नियुक्तीसाठी, अधिकाऱ्याकडे सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे, या अनिवार्य पात्रतेच्या अटीची जाणीव असूनही, पात्रता निकष पूर्ण करत नसतानाही अप्रामाणिक हेतूने, शिरीष आरदवाड यांना महापालिका शहर अभियंता पदाचा कार्यभार दिला. या कार्यभारामुळे ३१ मे २०२४ पासून, शिरीष आरदवाड बेकायदेशीरपणे आणि मनमानीपणे शहर अभियंता म्हणून काम करत आहेत...

१२ नोव्हेंबर २०२४ रोजी, संतोष जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांना पत्र लिहून, शिरीष आरदवाड यांची अतिरिक्त शहर अभियंता (यांत्रिक/विद्युत) आणि नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता म्हणून नियुक्ती करताना त्यांनी केलेल्या सर्व अनियमितता आणि बेकायदेशीर कृत्ये स्पष्टपणे त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे... या पार्श्वभूमीवर शिरीष आदरवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही...

Post a Comment

Previous Post Next Post