सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:-वनपरीक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गाव व शिवारात एका आठवड्यापासून वाघांनी धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर रोज होणाऱ्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने गावातील नागरिकांना शेतीचे काम करावे तरी कसे? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे... आणि वन विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केला आहे... वनपरिक्षेत्र रामटेक हद्दीतील सत्रापूर गावात गेल्या एका आठवड्यापासून दोन ते तीन वाघांचा धुमाकूळ असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली... वाघांनी गुरुवार दि.५ जूनला सत्रापूर येथील रहिवासी उदाराम आप्तुरकर यांच्या शेतातील दोन बकऱ्या, भीमराव ठाकूर यांचा एक वासरू तर देवमन उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसाढवळ्या हल्ला करीत ठार केले... अशा स्थितीत वाघाची या परिसरात धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी? असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा झालेला आहे... या संपूर्ण घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली... क्षेत्रसहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम व बिट वनरक्षक रेखा चोंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती क्षेत्रसहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांनी माध्यमांना दिली असून गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा, जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या...
वाघाची हालचाली ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
वाघाची धुमाकूळ पाहण्या करिता वन विभागाने कॅमेरे देखील लावले. घटनास्थळावरून सुमारे १०० मीटर पर्यंत वाघाने गाईची शिकार करून ओढत नल्याचे दिसून आले. या कॅमेऱ्यामध्ये गाई जवळ वाघ उभा असल्याचे चित्रही कैद झाले आहे. उपसरपंच पंकज चौधरी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असतांना परिसरात माकडे जोरजोरात ओरडत होते याचा अर्थ वाघ याच परिसरात थांबला असावा अशी शक्यता उपसरपंच यांनी व्यक्त केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात बंदुकीने आवाज करीत त्या वाघाला परिसराच्या बाहेर जंगलाच्या दिशेने गेल्याचा दावा वनपरीक्षेत्र अधिकारी बन्सोडे यांनी केला...
