मुंबई:- मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे विविध प्रकल्प आणि पुणे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष बैठक पार पडली...
यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या डिजिटल मोबाईल ऍप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. या ऍप्लिकेशनमध्ये माध्यमातून भाडे व्यवस्थापन, तक्रार निवारण, पुनर्वसन झालेल्या सदनिकेचे हस्तांतरण, प्रकल्पबाधित पीएपी वाटप प्रणाली, भेटीची व्यवस्थापन प्रणाली, तुमचे पत्र शोधा, व्हाट्सअप चॅटबोट, व्हाट्सअप चॅनलचा समावेश करण्यात आला आहे... याद्वारे एसआरए प्राधिकरणाच्या कार्यालयात दररोज होणारी गर्दी कमी व्हावी तसेच नागरिकांना घरबसल्या सर्व माहिती मिळावी यासाठी हे ॲप्लिकेशन उपयुक्त ठरणार आहे...
तसेच मुंबईत सुरु असलेल्या एसआरए योजना, त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच या योजनांमध्ये बीएमसी, एमएमआरडीएने यांच्या प्रकल्पबधितांना प्राधान्याने सामावून घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. तर प्राधिकरणाच्या ८२ प्रलंबित पुनर्वसन योजनांना गती देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले...
पुण्यातील आणि एमएमआर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. पुण्यातील जुन्या वाड्यात राहणारे गरीब नागरिक आणि पुण्यात टेकडीवर वसलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी योजना तयार करावी असे निर्देश या बैठकीत दिले... तसेच एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना व्यवहार्य व्हावी यासाठी प्रोत्साहन योजना तयार करण्याचे देखील निर्देश यावेळी देण्यात आले...
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..
