मांडवा सागरी पोलिसांनी शपथ सोबत दिली अमली पदार्थ विरुद्ध कायदेशीर तरतुदी व दुष्परिणामांची माहिती,
सोगाव - अब्दुल सोगावकर : सध्याची पिढी हि अमली पदार्थ यांच्या विळख्यात अडकून आपले अनमोल असे जीवन स्वतःहून नष्ट(बरबाद) करत आहेत. याबाबत नेहमीच जनतेला परावृत्त करण्यासाठी मांडवा सागरी पोलीस विविध उपक्रम राबवित असतात. दि. २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा करत जनजागृती व अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत सामाजिक कार्यकर्ते, संस्था, पोलीस प्रशासन व शासकीय पातळीवर माहिती देण्यात येते. या दिनानिमित्त मांडवा सागरी पोलिसांनी चोंढी व सारळ हायस्कूल मध्ये जनजागृती करत अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व कायदेशीर तरतुदी तसेच शिक्षा याविषयी माहिती दिली आहे....
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गुरुवार दि. २६ जून रोजी मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय चोंढी- किहीम येथील शाळेत विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ विरोधात जनजागृती करण्यासाठी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व त्यांचे सहकारी यांनी अमली पदार्थ म्हणजे काय? अमली पदार्थ याचे सेवन केल्यास होणारे दुष्परिणाम व कायदेशीर तरतुदी तसेच त्यासंबंधी असलेले कठोर कायदे व शिक्षा याविषयी चित्रफितीद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली...
तसेच सारळ हायस्कूल मध्ये अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करत निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते...
तसेच लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ चोंढी- किहीम हायस्कूलचे १३० पेक्षा जास्त विद्यार्थी, ८ शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यादरम्यान दोन्ही शाळेत अमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांसह सर्वांना शपथ देखील देण्यात आली...
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाणे तर्फे पोलीस निरीक्षक दिपक भोई, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार व त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली तसेच चोंढी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दळवी सर व सारळ शाळेच्या पाटील मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले...
फोटो लाईन :जागतिक अमली पदार्थ दिनानिमित्त चोंढी शाळेत जनजागृती करताना मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व उपस्थित विद्यार्थी व इतर मान्यवर