अलिबाग (ओमकार नागावकर) –
उसर (ता. अलिबाग) येथील गेल इंडिया लि. कंपनीविरोधात संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने थेट बेमुदत कामबंद आंदोलन छेडले असून, आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे... भूमिपुत्रांना रोजगार नाकारण्याच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करत हे आंदोलन पेटले आहे...
दि. २५ जून २०२५ पासून सुरू झालेल्या या तीव्र आंदोलनामागे गेल प्रशासनाची ढिसाळ, आडमुठी आणि भूमिपुत्र विरोधी भूमिका कारणीभूत आहे... ज्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला, त्याच प्रकल्पग्रस्तांना गेल कंपनीने रोजंदारीपासून वंचित ठेवले आहे...
आज जवळपास ३ ते ४ हजार परप्रांतीय कामगार कंपनीत कार्यरत असून, दिड-दोनशे स्थानिक बेरोजगार तरुणांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे... प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा "लवकरच रोजगार दिला जाईल" अशी आश्वासने दिली, पण ती फसवी ठरली... प्रत्येकवेळी वेळकाढूपणा, खोटी आश्वासने आणि थापेबाजी – हेच प्रशासनाचे धोरण राहिले आहे...
स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय सहनशक्तीच्या सीमा ओलांडत असल्याने, २५ जूनपासून भिक मागो आंदोलन, आणि २६ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली... कंपनी प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी आता दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे...
"प्रत्येक दिवसाला कोट्यवधींचे नुकसान सहन करूनही, आम्हाला रोजगार नको!" असा अघोरी संदेश गेल प्रशासन देत आहे का?" असा सवाल सध्या तालुक्यात चव्हाट्यावर आहे...
प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे – "जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!"