भाजपसोबतच्या समीकरणांवर तीव्र नाराजी
माणगाव :- (नरेश पाटील): रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते, अनुभवी प्रशासक आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सदानंद येलवे यांनी पक्षाच्या सध्याच्या भाजपप्रेमी वाटचालीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णायक निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. 81 वर्षीय येलवे: अंतुले यांचे विश्वासू सहकारी, कोकणातील मान्यवर व्यक्तिमत्त्व सदानंद येलवे हे स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे खासगी स्वीय सचिव राहिलेले असून त्यांच्या काळात प्रशासनात आणि राजकारणात सक्रिय भूमिका बजावलेली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक चळवळी, गोर गरीब, शेतकरी हक्क, ग्रामीण न्यायासाठी लढा आणि काँग्रेस विचारधारेचा सातत्याने प्रसार ही त्यांची ओळख आहे...
भाजपशी जवळीक मान्य नाही – काँग्रेसच खरी पर्यायविहीन विचारधारा. “शरद पवार गट भाजपच्या दिशेने सरकत असल्याच्या हालचाली आम्हाला अजिबात मान्य नाहीत. आमचा राजकीय पाया आणि विचार काँग्रेसशी निष्ठावान आहे. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असं येलवे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी काँग्रेसच्या कोकणातील ज्येष्ठ नेते राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. “रायगड जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसचा सुवर्णकाळ आणण्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य अर्पण करणार आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले...
रायगडमधील बदलत्या समीकरणांना चालना...
येलवे यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सभापती आणि माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांच्यासह अनेक पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. हा फटका शरद पवार गटासाठी विशेषतः रायगडसारख्या मजबूत मतदारसंघात मोठा ठरू शकतो. राज्य कार्यकारिणीमध्ये जबाबदारीची अपेक्षा, काँग्रेसला यश मिळवून देण्याचा निर्धार “काँग्रेस पक्षाने आम्हाला राज्य कार्यकारिणीमध्ये जबाबदारी दिल्यास, आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढली निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजयी करण्यासाठी झोकून देऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...
राजकीय भूकंपाची सुरुवात?
शरद पवार आणि अजित पवार यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असताना, आणि केंद्रातील भाजपसोबत भागीदारीचे संकेत मिळत असताना, येलवे यांचा निर्णय हा रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी "राजकीय भूकंपाची" सुरुवात ठरू शकतो. आगामी काही दिवसांत या निर्णयाचे लोण रायगड जिल्हा सह संपूर्ण कोकणात पसरू शकते असे संकेत मिळाले आहे...
