अपुरी सफाई कर्मचारी संख्या नगरपंचायतीसमोर मोठे आव्हान
माणगाव (प्रतिनिधी-:नरेश पाटील): माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नुकतीच प्रथमच स्वच्छता करण्यात आल्याची बाब समोर आली असून, यामागे नगरपंचायतीकडे असलेली सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे...संपूर्ण शहरात केवळ ९ सफाई कर्मचारी आणि १ मुकादम कार्यरत असून, त्यांच्यावर १९ वॉर्डांची जबाबदारी आहे... परिणामी, अनेक भागांमध्ये नियमित स्वच्छतेचा अभाव जाणवतो आहे...
विशेष म्हणजे, वॉर्ड क्रमांक १६ मधील खांदाड परिसरातून मोर्बा रस्त्याशी जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची स्वच्छता १२ एप्रिल रोजी प्रथमच करण्यात आली... काही वर्षांपूर्वी लाखो रुपयांच्या खर्चाने या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण झाले होते. मात्र, या भागात आजवर कोणतेही स्वच्छतेचे नियोजन नव्हते, ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली...
स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी नगरपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. तथापि, अपुरी मनुष्यबळाची अडचण असल्यामुळे स्वच्छता विभागाला नियमित कारवाई करणे शक्य झाले नाही. प्रशासकीय नियमानुसार प्रत्येक वॉर्डात किमान दोन सफाई कर्मचारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार, शहरासाठी किमान ३८ ते ४० सफाई कर्मचारी गरजेचे असताना, सध्या केवळ ९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या कामावर मोठा परिणाम होत आहे...
या कामात दिवसाही काम करून रात्रीही ड्युटी बजावावी लागत असल्यामुळे कर्मचारी वर्गावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजांचा विचार करता, नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे...
या पार्श्वभूमीवर, वॉर्ड सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासन यांनी शासनाकडे किमान ३० नवीन सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करणे गरजेचे आहे...
दरम्यान, शेलार नाका ते खांदाड मार्ग हा मोर्बा रस्त्याशी जोडला गेल्यामुळे या परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे. विशेषतः सुटीच्या दिवशी आणि वाहतूक कोंडीच्या वेळेस या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून येते. त्यामुळे या मार्गाची नियमित स्वच्छता करणे ही काळाची गरज बनली आहे...
१२ एप्रिल रोजी सफाई कामगारांनी सदर मार्गाची झाडलोट केली. यानंतर नागरिकांनी ही दृश्ये आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून सामाजिक माध्यमांवर स्टेटसद्वारे शेअर केली... काही नागरिकांनी हे व्हिडीओ आमच्या प्रतिनिधीकडेही पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकीकडे प्रशासनावरील नाराजी व्यक्त करण्यात आली, तर काहींनी समाधानही दर्शवले...
सदर प्रकरण उघडकीस येण्यामागे वॉर्ड क्रमांक १६ मधील राजीव मराठी शाळेपासून मोर्बा रोडकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर नाल्याच्या समस्येमुळे निर्माण झालेली अस्वच्छता कारणीभूत ठरली. येथील रहिवासी वालेराव यांनी नाल्याची स्वच्छता, सांडपाण्याचे व्यवस्थापन, डीडीटी फवारणी व रस्त्याची स्वच्छता यावर नगरपंचायतीला सूचना दिल्यानंतर सफाई कामगारांनी तात्काळ झाडलोट करून पहिलं पाऊल उचलले...
माणगाव नगरपंचायतीने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे... शहराच्या स्वच्छतेसाठी हे अत्यावश्यक ठरत आहे...
