महाराष्ट्र वेदभुमी

माणगावमध्ये महावीर जयंती भक्तीभावाने साजरी

 

माणगाव (प्रतिनिधी – नरेश पाटील)

गुरुवार, दि. 10 एप्रिल 2025 रोजी माणगाव शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली... जैन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा हा दिवस, भगवान महावीर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो... माणगावमधील सर्व जैन बांधवांनी या दिवशी एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून महावीर जयंतीचा आनंद साजरा केला...

सकाळी माणगाव बाजारपेठेतील जैन मंदिरापासून प्रारंभ झालेली ही मिरवणूक कचेरी रोड कॉर्नर, मुख्य बाजारपेठ, बालाजी कॉम्प्लेक्स मार्गे पुन्हा जैन मंदिरात परत आली... मिरवणुकीमध्ये महिला भगिनी पारंपरिक जैन पोशाखात सजून सहभागी झाल्या होत्या... युवक-युवतींनी सांस्कृतिक व धार्मिक गीते गायन करत वातावरण भक्तिमय केले...

महावीर जयंती हा फक्त एक धार्मिक सण नसून, तो मानवतेचा, शांततेचा आणि नैतिकतेचा संदेश देणारा दिवस मानला जातो... भगवान महावीर यांनी 'अहिंसा परमो धर्मः', 'अनेकांतवाद' व 'अपरिग्रह' यांसारख्या तत्वांचा प्रसार केला... या दिवशी त्यांच्या शिकवणीचा स्मरण करून, अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते...

जैन मंदिरात सकाळी विशेष पूजाअर्चा, अभिषेक, ध्यानसत्र आणि धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले... प्रवचनामध्ये भगवान महावीरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला...

या सोहळ्यात माणगावातील सर्व जैन बांधव, व्यापारी वर्ग, महिला मंडळ, युवक मंडळ, तसेच विविध जैन संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला...

कार्यक्रमाची सांगता महाआरती आणि प्रसाद वाटपाने करण्यात आली... महावीर जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण माणगाव शहरात शांतता, समता व बंधुतेचा संदेश दिला गेला...

Post a Comment

Previous Post Next Post