महाराष्ट्र वेदभुमी

नाल्यांतील अडथळ्यामुळे खांदाड परिसरात सांडपाण्याची गंभीर समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

माणगाव (प्रतिनिधी – नरेश पाटील): माणगाव शहरातील खांदाड परिसरात नाल्यांवर माती टाकून बुजवल्यामुळे गंभीर सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे... या समस्येमुळे परिसरात दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढणे आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे... यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक वालेराव साहेब यांनी गुरुवारी, दि. 10 एप्रिल रोजी सकाळी समय प्रतिनिधीशी संवाद साधून चिंता व्यक्त केली...

खांदाड भागातील अंतर्गत रस्त्यावरून मोर्बा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर, वालेराव ते किशोर डोंगरे यांच्या घरांलगत असलेल्या नाल्यात पूराचे आणि पावसाचे पाणी अडून राहते... काही वर्षांपूर्वी या भागात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम आणि नाल्याचे बांधकाम करण्यात आले होते...मात्र, गेल्या 15 दिवसांपासून मोर्बा रोडकडील पाच ठिकाणी नाले मातीच्या ढिगाऱ्याने बुजवले गेले आहेत... परिणामी सांडपाणी साचून नाल्यांतून परत फिरू लागले असून, ते तलावासारख्या खड्ड्यात साठून प्रचंड दुर्गंधी निर्माण करत आहे...

या भागातील समस्या अनेकदा स्थानिक प्रसारमाध्यमांतून अधोरेखित करण्यात आली असूनही, नगरपरिषदेकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत... माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी याची दखल घेतली होती, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थेच आहे...

वालेराव यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोर असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात माती आणि काँक्रिट टाकण्यात आल्याचे निदर्शनास आणले... यामुळे पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे...

याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तातडीने पुढाकार घेऊन:

नाल्यांची साफसफाई करावी, डीडीटी पावडरची फवारणी करावी, मातीचे ढिगारे हटवावेत,नाल्याचा लेआउट नीट केला जावा, सांडपाणी थेट नाल्यात सोडणाऱ्यांवर नोटीस पाठवून कठोर कारवाई करावी...असे मागणीचे निवेदन दिले आहे...

दरम्यान, या भागातील एका तीन मजली इमारतीची सेप्टिक टाकी अर्धवट नाल्याच्या कामामुळे फुटली असून, गेल्या वर्षभरापासून त्यातून सांडपाणी बाहेर येत आहे... यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक ज्ञानदेव पोवार, सिटी कोऑर्डिनेटर अतुल जाधव आणि कंत्राटी अभियंता शुभम करडे यांनी पाहणी केली होती... मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे...

गुरुवारी सकाळी 11 वाजता नाल्यातून सांडपाणी वाहत असताना दुर्गंधीच्या तक्रारी वाढल्याने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित इमारतीच्या मालकांना फोनवरून संपर्क करण्याची घाई झाली... या सगळ्या प्रकारावरून नगरपरिषदेचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येतो...

स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी केली आहे... अन्यथा येत्या पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच येथीलचे काही तरुण युवक, पोलीस पाटील तसेच वालेराव साहेब न. पं. चा कार्यलयात जाऊन तक्रार मांडणार असल्याचे ही माहिती हाती लागली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post