दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली!
माणगाव :- (नरेश पाटिल): पहलगाम (काश्मीर) येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप 26 भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करत शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता माणगावमध्ये भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने एक भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. या मशाल मोर्चाची सुरुवात बालाजी मंदिर येथून झाली. त्यानंतर मोर्चा निजामपूर कॉर्नरमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली व पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. दहशतवाद्यांच्या या क्रूर हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत उपस्थितांनी एकच आवाजात पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या विरोधात संतप्त घोषणा दिल्या. मोर्चा पुढे मुख्य बाजारपेठ, कचेरी रोड मार्गे जात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मैदानात वीर यशवंत धाडगे यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. तेथे पोहोचल्यावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी या क्रूर घटनेमुळे दुःखित झालेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. या मशाल मोर्चाला माणगावकरांचा उत्स्फूर्त आणि भव्य प्रतिसाद लाभला. या वेळी केवळ भाजपच नव्हे, तर इतर पक्षांचे व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, भाजपचे तालुका अध्यक्ष परेश सांगले, माणगाव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा डाळवी, चॅरिझेन फाउंडेशन चे दहा शिख रेजिमेंट चे माजी कॅप्टन एन. एस. रांधवा, सीनियर सिटीझन्स फोरम, कोकण उत्तर भारतीय एकता मंचाचे माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह, राष्ट्र सेविका समिती, एकता मित्र मंडळ खांदाड यांसारख्या अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या यशस्वी मशाल मोर्चासाठी भाजप युवा मोर्चा रायगडचे अध्यक्ष निलेश थोरेंनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. ही मशाल मोर्चा शांततेत पार पडला, पण प्रत्येक मशालीतून माणगावकरांचा संताप आणि हुतात्म्यांप्रतीची कृतज्ञता तेजस्वीपणे झळकत होती!..
