महाराष्ट्र वेदभुमी

समीर शेडगे यांचा शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश ; मंत्री, खासदार, आमदारांची उपस्थिती


शेडगे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला नवी ऊर्जा मिळेल : खा. सुनिल तटकरे 

रोहा : रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे भूतपूर्व तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी त्यांचे शेकडो समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने रोहेकरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार असून आपण सर्वदूर बांधिलकी घेऊन रोह्याच्या विकासासाठी एकत्रपणे काम करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी रोहा येथे पक्षप्रवेश सोहळ्यात केले...

शहरातील ऐतिहासिक राममारुती चौक येथे आयोजित जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी खा. सुनिल तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री. अदिती तटकरे, माजी आम.अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, सरचिटणीस सुरेश मगर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करत असताना खा. सुनिल तटकरे यांनी समीर शेडगे कामाचा, कष्टाचा आणि मेहनत घेणारा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याचे मी जाहीरपणे कौतुक करतो. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे तीन पिढ्यांचे नाते आहे. आमचे राजकीय मतभेद होते. परंतु मनभेद नव्हते. मात्र समीर शेडगे यांच्या प्रवेशाने राजकीय मतभेद देखील दूर झाले असून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पूर्णपणे शहराच्या विकासासाठी काम करायला मिळेल. अदिती, अनिकेत आणि समीर या पुढे रोहा तालुका व जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील. त्यामुळे मला महाराष्ट्र आणि केंद्रात काम करण्यासाठी मोकळीक मिळाली आहे असे सांगत समीरने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. आता या पुढे नव्या जुन्यांचा वाद राहणार नाही. सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असा विश्वास देखील खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला...

पक्ष प्रवेश सोहळ्यापूर्वी तीन बत्ती नाका ते राम मारुती चौक पर्यंत खा. सुनिल तटकरे व समीर शेडगे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांची वाजत गाजत भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली...

चौकट : 

समीर शेडगे हे तटकरे साहेबांच्या छत्रछाये खाली तयार झाले आहेत. शिवसेनेतून ते पुन्हा आपल्या कुटुंबात सामील झाले आहेत. समज गैरसमज दूर झाल्यानंतर आपण सर्वजण परत एकदा एकत्र आलो आहोत समीरभाईच्या प्रवेशाने अनेकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. आता पर्यंत आपण लाडक्या बहिणीसाठी प्रामाणिक काम केलेत परंतु आता मला लाडका भाऊ मिळाला असे सांगत शहराच्या विकासासाठी आपण जोमाने कामाला लागू या असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे यांनी यावेळी केले...

 यांनी केला पक्ष प्रवेश -

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या समवेत उपतालुका प्रमुख महादेव साळवी, तालुका महिला संघटक नीताताई हजारे, शहर महिला संघटक समीक्षा बामणे, अनिकेत साळवी, आदित्य कोंडाळकर, अमित कासट, इरफान दर्जी, बिलाल मोरबेकर, मुजम्मील येरुणकर, समीर दाखवे, हर्षद साळवी, गणेश हजारे, मजहर सिद्दीक, जव्वाद कुवारे आदी प्रमुख मंडळीसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला...

Post a Comment

Previous Post Next Post