माणगाव (नरेश पाटील): डॉ. जी. टाटकर महाविद्यालयात आयोजित एका प्रेरणादायी सत्रात जमात-ए-इस्लामी हिंद (महाराष्ट्र) चे सचिव डॉ. रफीक पारणेकर यांनी ‘रोजा’ म्हणजे रमजानच्या उपवासाबाबत केवळ धार्मिक आचरण न मानता, तो एक सार्वत्रिक मूल्यांचा – आत्मसंयम, सहानुभूती व ऐक्याचा – संदेश आहे, असे स्पष्ट केले...
मंगळवार, दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे संबोधित करताना डॉ. पारणेकर म्हणाले, “रोजा केवळ शरीरच नव्हे तर मन आणि आत्म्याचेही शुद्धीकरण करते. सत्य, करुणा आणि समता ही रोजाच्या मागील खरी मूल्यं असून ती सर्व धर्मांच्या पलीकडे जातात.” त्यांनी उपवासाचे आधुनिक काळातील नैतिक आचरण व मानवतेच्या एकतेशी असलेले नाते अधोरेखित केले...
जमात-ए-इस्लामी हिंद रायगड युनिट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य प्रा. बी. एम. खामकर, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य व इतर वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते... डॉ. पारणेकर यांचे विचार सर्वधर्मीयांपर्यंत पोहोचले आणि रमजानचा आत्मा सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले...
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा संयोजक फसीहुद्दीन फालाही व माणगाव शहराध्यक्ष मशीर कारेल यांनी विशेष मेहनत घेतली... कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. पांडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आचार्य सर यांनी केले....
