वायुसेनेच्या सायकल वीरांचे रामटेकात जल्लोषात स्वागत
चेरी फार्म येथे स्वागत, सत्कार सोहळ्याचे आयोजन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- सातशे किमी सायकलींग करुन रामटेकला पोहोचलेल्या वायुसेनेच्या सायकल विरांचा, ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून, त्यांना फेटे बांधून, पुष्पहारांनी स्वागत करुन व स्मृतीचिन्ह देवून रामटेक येथील ॲडव्हेंचर चेरी फार्म येथे हृद्य सत्कार करण्यात आला. जवानांचा असा सन्मान कोण करतं, अशा प्रकारचा हा आमचा आयुष्यातला पहिलाच सत्कार असेल अशा भावना सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्तींनी व्यक्त केल्या. आम्ही या सत्काराने भारावून गेलो असून रामटेक कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन या सायकलींग एक्सपिडीशनचे प्रमुख विंग कमांडर मनोजकुमार यांनी केले. कानपूरवरुन १७ मार्च ला हे सायकलर्स निघाले. कानपूर, बांदा, चिञकुट, मैय्यर, कटनी, जबलपूर, शिवनी करीत २३ मार्चला सातशे किमी.टप्पा पार करीत ते रामटेकला पोहोचले. रामटेक येथील ॲडव्हेंचर चेरी फार्मच्या निसर्गरम्य व प्रसन्न वातावणात चेरी फार्म, सृष्टी सौंदर्य परिवार आणि पञकार संघाच्या वतीने देशाचा अभिमान असणार्या भारतीय वायु सेनेच्या या सायकल विरांची भारत माता की जय च्या घोषणांनी अगवानी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जवानांना फेटे बांधण्यात आले. चेरी फार्मच्या संचालक रजनी खंते, भारती खंते, मनीष मख, संदेश, सृष्टी सौंदर्यचे ऋषीकेश किंमतकर, मोकदम, नारनवरे, सारंग पंडे, शेखर पाटील, नत्थु घरजाळे, राजु कापसे, पंकज बावनकर यांनी पळस फुलांचे हार, गुलाब पुष्प आणि भेटवस्तु देवून सायकल विरांचा सत्कार केला. माजी प्राचार्य दीपक गिरधर यांनी संचालन करताना प्रभु श्रीरामांचे वनगमना दरम्यान रामटेक भेट, महाकवि कालिदासांचा साहित्य वारसा, रामटेकचे पौराणिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेले महत्व विषद केले. या भावपूर्ण सत्काराने देशाचे रक्षणकर्ते वायुवीर भारावून गेले. रामटेक नाव माहिती होते परंतु या गावाचा देदिप्यमान इतिहास अजिबात माहीती नव्हता, देशाच्या सैनिकांप्रति असलेली भावना , प्रेम आणि रामटेकरांनी केलेला हा भावपूर्ण सन्मान कायम लक्षात राहील अशी भावना विंग कमांडर मनोजकुमार आणि विंग कमांडर धारणी यांनी सत्काराला उत्तरा दाखल व्यक्त केली...
स्थानांतरणाच्या सत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य
भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडचे देशभरात आठ कमांड आँफीस आहेत. यापैकी लखनऊ कमांड आँफीस ७० वर्षांपूर्वी नागपूरला स्थानांतरीत करण्यात आले. या स्मृती जपण्यासाठी नागपूर वायुसेना कमांड आँफीस कडून स्थानांतरणाचा ७० वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मॅराॅथाॅन,सायकलींग एक्सपिडीशन या सारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कानपूर वायुसेना कार्यालयाच्या वतीने कानपूर ते नागपूर सायकलींग एक्सपिडीशन करण्यात आले. विंग कमांडर मनोजकुमार, विंग कमांडर एल.एस.धारणी आणि विंग कमांडर परिवस्था साहा यांनी या सायकलींग एक्सपिडीशनचे नेतृत्व केले. सतरा सायकलर्स आणि पाच जणांचा सपोर्ट स्टाफ अशा एकूण २२ अधिकारी व जवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला...