कोल्हापूर प्रतिनिधी (किशोर जासूद): चित्तथरारक हिमालयीन परिस्थितीत चीन सीमेवरील कर्तव्यावर असताना, शित्तूर तर्फ मलकापूरचे जवान सुनील गुजर (वय ३०) देशसेवेची अखेरची आहुती देत शहीद झाले. सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) तुकडीमध्ये कार्यरत असलेले सुनील गुजर हे डोजर चालवत असताना वाहन ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला...
सुनील गुजर यांच्या मागे पत्नी, आई-वडील आणि अवघ्या पाच महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या लहानग्या मुलाचे पितृछत्र हिरावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. गावकऱ्यांनी सांगितले की, सुनील हे त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष होते आणि त्यांनी देशसेवेची जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडली...
गुजर कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गाव या दुःखात सहभागी झाले आहे. "सुनील हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय होता... त्याचे बलिदान देशासाठी अजरामर राहील," असे भावूक शब्द गावातील लोकांनी व्यक्त केले...
सैन्यदलाने सुनील गुजर यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक निष्ठावंत जवान गमावला आहे...
