महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा महामार्ग दिरंगाई शिमगा आंदोलन! सरकारला जळजळीत इशारा.


माणगाव :- (नरेश पाटील)  रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्णत्वाने कोकणवासीयांचे हाल सुरूच आहेत. महामार्गाचे काम केवळ कागदोपत्रीच पुढे सरकत असून, प्रत्यक्षात ठोस काहीच घडत नाही... कोकणवासीय रोज अपघात, वाहतूक कोंडी, आणि खराब रस्त्यांचा सामना करत आहेत, पण सरकार मात्र आश्वासनांची पखरण करत बसले आहे... या अन्यायाविरोधात आणि सरकारला जागे करण्यासाठी जन आक्रोश समिती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संयुक्तपणे शिमगा आंदोलन करत महामार्गावर सरकारच्या निष्क्रियतेची होळी पेटवली...

गुरुवारी, १३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता माणगाव बसस्थानकावर आंदोलनाला सुरूवात झाली.. शेकडो शिवसैनिक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक महामार्गावर उतरले. "मुंबई-गोवा महामार्ग त्वरित पूर्ण करा", "कोकणाला विकास हवा, फसवी आश्वासने नाहीत", "सरकारला झोपेतून उठवू!" अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला...महामार्गाच्या दिरंगाईने कोकणवासीयांचा संताप अनावर झाला असून, सरकारला कधी जाग येणार? असा सवाल आंदोलकांनी केला... हा महामार्ग कोकणसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पर्यटन आणि व्यवसायाच्या संधींसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे, पण सरकारच्या उदासीनतेमुळे हा विकास रोखला जात आहे... कोकणवासीयांना सतत फसवले जात आहे... अनेक वेळा घोषणा झाल्या, निधी मंजूर झाल्याची वक्तव्ये आली, पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम काहीच पुढे सरकत नाही... कोकणवासीय आता डोळे झाकून बसणार नाहीत, हे सरकारला दाखवून देण्यासाठी हे आंदोलन उभे राहिले आहे...

या आंदोलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे,माणगाव व्यापार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष लक्षमण बाळा दळवी,दक्षिण रायगड संपर्क प्रमुख नागेंद्र उमेश राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, उप जिल्हाप्रमुख पद्ममाकर मोरे, दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख स्वीटी गिरासे, मोरे मॅडम, रायगड जिल्हा शिव वाहतूक सेना अध्यक्ष प्रभाकर मानकर, महाड विधानसभा क्षेत्र प्रमुख जनार्दन मानकर, महाड ता. प्रमुख पळस्कर, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवासेना संपर्क प्रमुख अजिंक्य मोरे, युवासेना रायगड जिल्हा चिटणीस डॉ. अमेय उभारे, म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, माणगाव शहर प्रमुख अजित तार्लेकर, सामाजिक कार्यकर्ते संजोग मानकर, म्हसळा शहर प्रमुख विशाल सायकर, माणगाव न. पंचायतचे नगरसेवक अजित तारलेकर, अजिंक्य जाधव, अभिजित घोणे, सुधीर सोनावणे, अजिंकेश जाधव, इब्राहिम करेल, ऋषी मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि जनतेचा सहभाग दिसून आला...

या आंदोलना दरम्यान महामार्गावर सरकारच्या निष्क्रियतेची होळी पेटवून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला...  सरकारच्या निष्क्रियतेला जनता आता माफ करणार नाही... हा महामार्ग पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील...

सरकार जर आता दुर्लक्ष करत राहिले, तर पुढील आंदोलन अधिक मोठे आणि आक्रमक होईल, असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला... कोकणवासीयांची सहनशक्ती संपली असून, आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे... सरकारने केवळ घोषणा आणि आश्वासनांवर चालणारी नाटकं बंद करून तत्काळ महामार्ग पूर्ण करावा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा जन आक्रोश समिती आणि शिवसेनेने दिला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post