महाराष्ट्र वेदभुमी

बसेस वाढवा..! वाहतुकीची कोंडी सोडवा


अवघ्या छेचाळीस बसेसवर रामटेक आगार धावतो

भंगार बसेस ठरतेय प्रवाशासाठी डोकेदुखी

मंत्रीमहोदय....बसस्थानकाच्या नुतनीकरणासोबतच बसेसचीही संख्या वाढवा

सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक:- येथील आगारात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार एसटी बसची संख्या कमी असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय होत आहे...बसस्थानकावर दीड ते दोन तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे...

गेल्या कित्येक वर्षानंतर रामटेक बसस्थानकाचे नुतनीकरण होणार आहे. राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नामुळे जुने बसस्थानक आता पाडण्यात येणार असुन जवळपास १५ कोटींच्या निधीमधुन एक भव्य व सुशोभीत बसस्थानक रामटेकला लाभाणार आहे... त्याची सुरुवातही झाली आहे. ही प्रशंसनीय व लोकांसाठी तेवढीच सोयीसुविधेची बाब असली तरी मात्र ' आम्हाला त्रास बसस्थानकाचा नाही तर बसेस च्या कमतरतेचा आहे ' असे लोकांचे म्हणने असुन मंत्रीमहोदय...बसस्थानकाच्या नुतनीकरणासोबतच बसेस ची संख्याही वाढवा अशी मागणी तालुक्यातील लोकांसह विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची आहे...

     तसे पहाले तर रामटेक शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज शेकडो ग्रामस्थ, शेतकरी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी एसटीने प्रवास करतात. यातच राज्य शासनाने एसटीच्या प्रवासात महिलांना ‘हाफ’ तिकीटची सवलत दिल्याने प्रवासी संख्येत वाढ होऊन एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली. यामुळे एसटी महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत. याबाबद रामटेक बसस्थानक व्यवस्थापकाचा प्रभारी कार्यभार असलेल्या रुपाली सेमस्कर यांची भेट घेऊन माहिती घेतली असता अवघ्या ४६ बसेसवर तालुक्याचा कार्यभार चालत असल्याचे चिंतनीय वास्तव समोर आले. तसेच येथे अगोदर ७५ बसेस होत्या, मात्र त्यातुन काही स्क्रॅप करण्यात आल्या व सध्याघडीला ४६ बसेस सुरु आहेत. यात कमीतकमी दहा बसेसची नितांत गरज असल्याचे प्रभारी व्यवस्थापक रुपाली सेमस्कर यांनी माहिती देतांना सांगितले. तेव्हा एकंदरीत ४६ बसेसमधुनच लोकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण सुरु आहे. तेव्हा प्रवाशांची कशी गैरसोय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. याच बसस्थानकावर कित्येक राजकिय मंडळी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून बसेसच्या मागणीसाठी धडकले आहे ही सत्यपरिस्थिती विसरून चालणार नाही. विशेषतः नागपुर ला जाणे येणे करणाऱ्या प्रवाशांची येथे एकच गर्दी होत असते. बस फलाटावर लागताच लोकांचे जत्थे बस च्या दरवाज्याकडे धावत असतात. काही प्रवाशी चढण्यात तथा बसण्यात यशस्वी होतात तर बाकी ते गर्दी पाहुणच दुसऱ्या बस ची वाट पहाणे पसंत करतात. त्याचप्रमाणे सायंकाळी साडेपाच च्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांची रामटेक बसस्थानकावर जणु जत्राच भरत असते. त्यांच्या गर्दीपुढे दोन - तिन बसेस सुद्धा कमी पडतात. यादरम्यान वयोवृद्ध लोकांच्या डोक्यात बसण्यासाठी जागा तर सोडा उभे राहुन प्रवास करण्याचा विचार सुद्धा येत नसावा हे येथील वास्तव परिस्थिती आहे. रामटेक ला आता स्वतः मंत्रीमहोदय असल्याने त्यांनी त्यांच्या पुढाकाराने दहा बसेस वाढवुन दिल्या असत्या तर लोकांकडुन मंत्री महोदयांचे मोठे कौतुक केल्या गेले असते यात तिळमात्रही शंका नाही.

भंगार बसेस ठरतेय लोकांसाठी डोकेदुखी

रामटेक बसस्थानकाकडे गेल्या काही वर्षात स्थानीक एकाही राजकिय नेत्याने जातीने लक्ष दिले नाही, ना कधी आंदोलन केले. परिणामस्वरूप बसेस च्या संख्येत वाढ तर सोडा पण उपलब्ध असलेल्या बसेस पैकी काही भंगार बसेस सुद्धा हे राजकिय बदलवु शकले नाही. तालुक्यात चार दिशेने धावणाऱ्या रामटेक आगाराच्या काही बसेस कुठेही तथा केव्हाही बंद होवुन उभ्या राहात असल्याचे तथा प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचे अनेक प्रकार निदर्शनास आले आहे, तरीही यात सुधारणा मात्र झाली नाही... आलेशान एसी वाहनातून प्रवास करणाऱ्या राजकियांना एस.टी. महामंडळाच्या भंगार बसेस मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत काय बरे सोयरसुतक...i असेच काही म्हणने वावगे ठरणार नाही...

Post a Comment

Previous Post Next Post