सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम.पी.एस.सी. मार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. एम.पी.एस. सी. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार अहोरात्र मेहनत घेत असतात. यात प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीनं मात करणारे अनेक उमेदवार यशस्वी झाले आहेत. एम.पी.एस.सी. वतीने 'गट-क' तील (ग्रुप सी) पदांसाठी डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि. ११/०२/२०२५ एम.पी.एस.सी. च्या कनिष्ठ सहाय्यक अंतर्गत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. यात नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील हिवरा (हिवरी) या गावातील एका शेतकरी कुंटूंबातील मुलीनं या परीक्षेत यश मिळवलं असून ती पहिल्याच प्रयत्नात कनिष्ठ सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेली आहे. महेश्वरी सुरेश नाटकर असं या मुलीचं नाव आहे...
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य व्हावे या हेतूने महाज्योती या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती व तिला एक वर्षापर्यंत मासिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली. होती...महाज्योतीच्या नियमानुसार मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मदतीने महेश्वरीने पुणे येथे जाऊन जवळपास एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा (एम.पी.एस.सी.) अभ्यास केला.महेश्वरी हिने या अगोदर महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा ('सेट') परीक्षाही राज्यशात्र या विषयात मागील वर्षी उत्तीर्ण केली आहे... ती खैरी (बिजेवाडा) रामटेक येथील विद्यासागर कला महाविद्यालयाची (पदवी अभ्यासक्रम) माजी विद्यार्थिनी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे एखाद्या विभागात लवकरच 'कनिष्ठ सहाय्यक' या पदावर महेश्वरीची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. एम.पी. एस. सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन या पदावर पोहचणारी मुलींपैकी ती तिच्या गावातील पहिली मुलगी ठरणार आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंब, गुरुजन, मित्र परिवार यांना दिले असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे....
