' कामापुरता वापरा नं मग याला विसरा '
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे शिक्षकांकडुनच अध्यापनाचा बट्ट्याबोळ
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-काळानुरूप अनेक शाळा या डिजिटल झाल्या, तर काही होत आहेत. सोबतच प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे फोनही आहेतच... मोबाइल आज काळाची गरज असली तरी त्याचा मर्यादित वापर करण्याची गरज आहे... परंतु आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविणारे शिक्षकही या ॲन्ड्राईड मोबाईलच्या गुंताळ्यात पुरते गुंतल्याचे सध्या चित्र असुन याच्या अतिरेकामुळे त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंडण पडत आहे... एकंदरित शिक्षकांकडुनच अध्यापनाचा बट्ट्याबोळ होतांना दिसुन येत आहे...
' कामापुरता वापरा नं मग याला विसरा ' असेच धोरण शिक्षकच नाही तर सर्वच विभागातील अधिकारी - कर्मचारी तथा तरुण पिढीने या ॲन्ड्राईड मोबाईल विषयी अंगीकारायला हवे हे तेवढेच खरे. मात्र असे होतांना दिसत नाही. सध्या शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही शाळांमधील काही शिक्षकवर्ग या ॲन्ड्राईड मोबाईल चा अतिरेक करतांना दिसुन येत आहे. परिणामस्वरूप फळ्यावर काही लिहुन तथा थोडंफार शिकवुन ' बाकी पोट्टे हो तुम्ही करत बसा ' अशी भुमीका घेत काही शिक्षक शासनाने त्यांना सोपविलेल्या जबाबदारीलाच तिलांजली देत आहे. महिन्याकाठी शासनाकडुन गलेलठ्ठ वेतन घेऊन ' एक टाईमपास ' धोरण काही शिक्षक चालवित असल्याची सध्या वस्तुस्थिती आहे. यात काही शिक्षक अपवादही आहे. त्यांनी आपआपल्या शाळेत एक उपक्रमशिल धोरण राबवुन उज्ज्वल भविष्याकडे विद्यार्थ्यांना अग्रेसर केलेले आहे आणि करीत आहे. सोबतच स्वतःसह शाळेचे नाव तालुक्यात, जिल्हयात तथा महाराष्ट्रात पोहोचविले आहे. असे काही शिक्षक सोडले तर इतर बहुतांश शाळेतील परिस्थिती या ॲन्ड्राईड मोबाईल च्या अतिरेकामुळे मोठी गंभीर झाली आहे. शाळेत योग्य शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग, मोबाईल, ॲन्ड्राईड टी.व्ही. तथा ऑनलाईन शिकवणी वर्गाचा आधार घ्यावा लागत आहे. पुर्वी फक्त दहावी किंवा बारावी तथा त्यावरील शिक्षणासाठी शिकवणी वर्गाची गरज भासत होती मात्र आतातर पहिल्या वर्गापासुनच मुलाला शिकवणी वर्गाचे ( ट्युशन क्लास ) तोंड पहावे लागते, ही येथे फार मोठी शोकांतीकाच म्हणने वावगे ठरणार नाही. मात्र असे का होत आहे ? याचा शिक्षण विभागाच्या वरिष्ठांनी शोध घेणे आजघडीला गरजेचे आहे. शिक्षकांकडेही शासनाने अध्यापनाखेरीज पुष्कळशी कामे लावुन ठेवली आहे हे विसरून चालणार नाही मात्र त्याव्यतिरीक्त जो वेळ अध्यापनासाठी मिळतो त्यात तरी त्यांनी विद्यार्थ्यांना योग्यरित्या शिकवणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या बोलण्या - चालण्यावर तथा वागणुकीवर लक्ष देणे गरजेचे आहे. जसे शुद्ध मराठी बोलणे, शिवीगाळ न करणे आदींवर शिक्षकांनी लक्ष दिले तर एक उत्तम प्रकारची पिढी घडेल यात शंका नाही कारण एकवेळ हे विद्यार्थी घरच्या मंडळींना जुमानत नाही मात्र शिक्षकांना घाबरतात तेव्हा याचा फायदा त्या विद्यार्थ्यांनाच सुधारण्यासाठी होवु शकतो. दुसरी एक उल्लेखनीय व तेवढीच महत्वाची बाब म्हणजे शिक्षकांना वर्गखोलीत मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली होती तेव्हा शिक्षकांकडुन अध्यापनाबाबदच्या तक्रारी नाही च्या बरोबर होत्या मात्र नुकतेच १ फेब्रुवारी पासुन विविध शैक्षणीक कामांच्या अनुषंगाने शासनाने वर्गखोलीत मोबाईल वापरास परवानगी दिली आहे. ही परवानगी देतांना शासनाने ' याचे विपरीत परिणाम सुद्धा होवु शकेल ' याबाबद जराही विचार केला नसेल का ? हे न समजनारेच कोडे आहे.
