सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-शेततळ्यात मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक योजना" हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम मत्स्यव्यवसाय विभाग, नागपूर व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या आर्थिक सहाय्याने रामटेक तालुक्यातील लोहडोंगरी येथे थेट शेततळ्याच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आला होता. या योजनेचा मुख्य उद्देश शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्य शेतीच्या उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करणे व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा होता. कार्यक्रमाअंतर्गत परिसरातील ४० शेततळी धारक शेतकऱ्यांना प्रत्येकी १००० मत्स्य बोटूकली (fingerlings) व प्रोबायोटिक्सचा पुरवठा करण्यात आला. यासोबतच, मत्स्य शेती व्यवस्थापनाची सर्वसमावेशक माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये मत्स्य शेतीच्या सर्वांगीण तांत्रिक बाबी जसे की जल व मृदा व्यवस्थापन, नैसर्गिक अन्न उत्पादनासाठी प्रोबायोटिक्सचा प्रभावी वापर, व पोषणमूल्ययुक्त खाद्याचा पुरवठा व व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दोनोडे यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. शुभम कोमरेवार, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नागपूर, यांनी मार्गदर्शन केले.सदर वेळी उप-विभागीय कृषी अधिकारी, रामटेक, तालुका कृषी अधिकारी रामटेक, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नागपूर उपस्थित होते. मार्गदर्शनादरम्यान शेततळ्यांतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जल व मृदा व्यवस्थापनाच्या पद्धतींचे महत्त्व समजावले. प्रोबायोटिक्सचा नैसर्गिक अन्न उत्पादनात प्रभावी उपयोग कसा होतो हे सविस्तर उलगडून सांगितले. तसेच, मत्स्य उत्पादनात अधिकाधिक वाढ करण्यासाठी पोषणमूल्ययुक्त खाद्याचा पुरवठा आणि योग्य व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्य बियाणे वाटप
शेतकऱ्यांनी मत्स्य संगोपनाशी संबंधित तांत्रिक व व्यवस्थापनाच्या अडचणींबद्दल प्रश्न विचारले, अधिकाऱ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तरे दिली. त्यांनी मत्स्य शेतीमधील नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींबद्दलही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय विभागाने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणणे व मत्स्य उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे...
शेतकर्यांचा मत्स्यउत्पादनात वाढीचा निर्धार
या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मत्स्य शेतीचे महत्त्व आणि त्याद्वारे आर्थिक लाभ मिळविण्याच्या संधींबद्दल अधिक माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी योजनेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मत्स्य उत्पादनात वाढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. भविष्यात असे उपक्रम आणखी व्यापक प्रमाणावर राबविण्याचा मत्स्यव्यवसाय विभागाचा मानस आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ होईल व मत्स्य शेती क्षेत्राला नवी दिशा मिळेल.
