महाराष्ट्र वेदभुमी

पंढरीत घुमला विठूनामाचा जयघोष; उदगीर येथील सगर दाम्पत्य मानाचे वारकरी



पंढरपूर(प्रतिनिधी)

 कार्तिकी एकादशीनिमित्त आजभ पंढरीत विठूनामाचा जयघोष पाहायला मिळतो आहे... कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुण्याचे  विभागीय आयुक्त श्री आणि सौ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते संपन्न झाली... यावेळी त्यांच्या समवेत श्री विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मानाचे वारकरी म्हणून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई सगर यांना मिळाला. उदगीरमधील गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दाम्पत्य गेली १४ वर्ष कार्तिकी वारी करत आहेत... त्यांना यंदाचा विठ्ठल रूक्मिणीच्या पूजेचा मान मिळाला... विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे मानाचे वारकरी सगर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले...

कार्तिक एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गर्भगृहात झेंडू , शेवंती, कार्नेशियन, गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे...या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे... पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी ही सजावट केली आहे... श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलांसह विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात आला आहे... तसंच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे... विठुरायाच्या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली १४ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत... गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात... आज कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पहाटे सुरुवातीला होणारी देवाची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तर देवाची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पार पडली... यानंतर पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची षोडशोपचारे महापूजा करण्यात आली...

पांडुरंगाच्या कृपेनेच आपल्याला ही महापूजा करण्याचं भाग्य लाभलंय, योगायोगानं आचारसंहिता सुरू असल्यानं शासनाचा आदेश मिळाला आणि हा महापूजा करण्याचा मान मिळाल्याचं डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितलं...महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आयुष्य सुखकर होवो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, आनंदमयी जीवन होवो, असं साकडं विठुरायाला घातल्याचं त्यांनी सांगितलं... निवडणूक शांततेनं पार पडावी ही मनातील सुप्त इच्छा पांडुरंग चरणी मांडली... मात्र, मला खात्री आहे, महाराष्ट्रातील निवडणूक नेहमीच शांततेनं पार पडते, असंही पुढे बोलताना डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितलं... मी बालपणापासून देवाच्या दर्शनाला येत आलोय, प्रत्येकवेळी एक वेगळं समाधान आणि आनंद विठ्ठल दर्शनानं मिळत होता... मात्र, यावेळी तो खूपच खास होता, अशा भावनाही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केल्या आहेत... दरम्यान, कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं... आपल्या लाडक्या विठुरायाचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post