सेवा शुल्क माफीच्या निर्णयामुळे भाजीबाजारात वर्दळ वाढेल
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार रामटेक व देवलापार उपबाजार आवारात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा मानस आहे...
विकासाच्या दिशेने गतिमान असलेल्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती सचिन किरपान व संचालक मंडळाने रामटेक येथील भाजीपाला बाजारावर असलेले सेवाशुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलाआहे. 'याविषयी अधिकृत माहिती सभापती सचिन किरपान यांनी शनिवारी (ता. २८) ला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली... या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे..
सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वात रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार व देवलापार उपबाजार आवारात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे... बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांनी विकास कामांचा झंझावात सुरू झाला आहे हे तेवढेच खरे आहे...कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामटेक येथील मुख्य कार्यालयात याविषयीची माहिती देताना किरपान यांनी या निर्णयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष १५ हजार लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला...रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शितलवाडी येथे सोमवार व शुक्रवार वगळता आठवड्यातील प्रत्येक दिवशी भाजीपाला बाजार भरतो... या भाजीपाला बाजारातील व्यवहारावर बाजार समितीकडून १ टक्का सेवा शुल्क आकारले जात होते... वर्षाकाठी साधारण १० लाख रुपये उत्पन्न याद्वारे बाजार समितीला मिळत होते... सेवा शुल्क माफीच्या निर्णयामुळे भाजीबाजारात वर्दळ वाढेल, भाजीपाल्याचा व्यापार वाढेल व त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाजीपाला उत्पादनाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा सभापती किरपान यांनी यावेळी व्यक्त केली...भाजीपाला बाजारातील लोकांची वर्दळ वाढल्याने येथील धान्य बाजारातील उलाढाल वाढेल व सेसही वाढेल... त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होईल, असेही किरपान म्हणाले...भाजीपाला बाजारावरील सेवा शुल्क माफ करणारी रामटेक ही महाराष्ट्रातील एकमेव बाजार समिती ठरावी. सभेला त्रिलोक मेहर, नकुल बरबटे, भिमराव आंबीलडुके , सचिव हनुमंता महाजन उपस्थित होते...
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचा हा निर्णय - किरपान
पत्र परिषदेत या निर्णयाविषयी स्पष्टपणे बोलताना सभापती सचिन किरपान यांनी सांगितले की हा निर्णय शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचा आहे... सेवा शुल्क माफ केल्याने एकीकडे भाजीपाला बाजारात खरेदीदारांची संख्या वाढेल परिणाम स्वरूप शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल तसेच रामटेकच्या गुजरीमध्ये बसणाऱ्या चिल्लर भाजीपाला विक्रेत्यांना येथून ठोक मध्ये भाजीपाला नेतांना कोणताही सेवा शुल्क द्यावा लागणार नसल्याने त्यांनाही मोठे समाधान मिळेल. एवढेच नव्हे तर आता सर्वसामान्य माणूस सुद्धा या बाजार समितीमध्ये येऊन बेझिझकपणे कोणताही सेवा शुल्क न देता ठोक मध्ये भाजीपाला घेऊन जाऊ शकतो...
