महाराष्ट्र वेदभुमी

सत्ताधार्‍यांना पायउतार करा-उल्का महाजन

 अलिबाग  प्रतिनिधी : प्रकल्पाच्या नावाखाली लाखो हेक्टर जमीन घेऊन शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे... देशात बेरोजगारीसह महिलांचा सन्मान, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे... फक्त जाहिरातबाजी करण्याचे काम केले जात आहे... जाहिरातबाजीच्या नावाने हजारो कोटींचा कर्ज डोक्यावर आहेे...ते कर्ज फेडण्यासाठी कराच्या रुपातून तुमच्याकडूनच वसूल केले जातील... एका हाताने द्यायचे व दुसर्‍या हाताने वसूल करायचे, हा फंडा या सरकारचा सुरु आहे... महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत...त्यामुळे हे सरकार सत्तेत बसण्याच्या लायकीचे नाही, त्यांना या निवडणुकीत जागा दाखविण्याची गरज आहे... त्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी महिलांनी निर्धार करा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केले...

रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबा’ची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन पेझारी येथील भैरवनाथ क्रीडा मैदानात मंगळवारी (दि.१ ऑक्टोबर) करण्यात आले...यावेळी उल्का महाजन बोलत होत्या...


यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा तथा माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, सरपंच प्राजक्ता म्हात्रे, उपसरपंच अ‍ॅड. मनोज धुमाळ, अनिता पाटील, भैरवी जाधव-पाटील आदी मान्यवरांसह फेडरेशन व महिला आघाडीच्या पदाधिकारी, सभासद, जिल्हा परिषद मतदारसंघ कुर्डूस व शहापूर विभागातील महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

उल्का महाजन म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शौर्याने ही भूमी पावन झालेली आहे... याच भूमीत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला... खोतीविरोधात ते लढा लढले होते... या लढ्यातून स्वाभिमानाची, हक्काची शिकवण मिळाली आहे... ती शिकवण घेऊन महिलांनी या सरकारविरोेधात लढा दिला पाहिजे...

निवडणुकीच्या तोंडावर या सरकारला बहिणीकरिता दीड हजार रुपये देणे का सुचले? विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर इतकी माया का उफाळून निघाली, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे... या लाडक्या भावाचे लाड घेण्यापेक्षा संविधानाने दिलेले हक्क आपल्याला मिळविण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘लाड नको, आमचे हक्क हवे’ हा विचार घेऊनच महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे... भ्रष्टाचाराने कमविलेले पैसे आम्हाला नको, असे लाडक्या भावाला सांगून त्यांना परत पाठवा...

पुढे त्यांनी सांगितले, मागील लोकसभा निवडणुकीत देशात तसेच राज्यात भाजपासह महायुतीला चांगलाच दणका मिळाला... त्यांना मतांची कडकी लागली म्हणून आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून आता बहीण लाडकी झाली आहे... भावांसाठी योजना सुरु केली असून, वयोवृद्धांसाठीदेखील मोफत तीर्थयात्रा सुरु केली... योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जात आहेत... गोरगरीब, दलित, ओबीसी, आदिवासी समाजासाठी असलेला पैसा जाहिरातीसाठी वापरला जात आहे... शिष्यवृत्तीसाठी सहा-सहा महिने या समाजातील मुलांना वाट पाहावी लागते, ही मोठी चिंतेची बाब आहे. दर १६ मिनिटाला महिलेवर अत्याचार होत असल्याची आकडेवारी आहे... महिलांचा अनादर करणार्‍या या सरकारला पुन्हा सत्तेत बसवू नका, असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले...

चौकट...

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद मतदारसंघ कुर्डूस व शहापूर विभागातील तीसहून अधिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला... राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकिंग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला... 

चौकट...

मान्यवरांच्या स्वागताला फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव

पेझारी येथील भैरवनाथ क्रीडा मैदानात महिलांच्या संवाद मेळाव्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखविली होती. चित्रलेखा पाटील, सुप्रिया पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, उल्का महाजन आदी मान्यवरांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन  होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली... त्यानंतर फुलांच्या वर्षाव, तसेच सर्व महिलांनी उपस्थित राहून मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले... दरम्यान, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली...या मिरवणुकीत विविध गाण्यांवर महिलांसह मान्यवरांनी ठेका धरल्याचे दिसून आले... एक वेगळा उत्साह यानिमित्ताने प्रत्येक महिलेच्या चेहर्‍यावर दिसून आला...

समाजातील वाईट प्रवृत्तीला रोखण्यासाठी महिलांनी पुढे या-चित्रलेखा पाटील

खारेपाट विभाग हा शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा आहे...या भूमीतून अनेक लढे झाले असून, अनेक संघर्ष लढले गेले आहेत... स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील यांच्यासह स्व. मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील यांच्या पाठीशी हा विभाग कायमच राहिला आहे... ही साथ अशीच कायम राहू द्या... काही मंडळी आपल्या स्वार्थासाठी दारुसह ड्रग्जच्या आहारी अनेक तरुणांना घालत आहेत...त्याचा तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे... ही प्रचंड वाईट प्रवृत्ती आहे... या प्रवृत्तीला रोखण्यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे... तुमच्या व तुमच्या विचारासोबत शेतकरी कामगार पक्ष पाठीशी कायम राहील, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले...

डावी चळवळ चुलीपर्यंत नेण्याचे काम महिलाच करू शकतात... महिलांची वैचारिक उंची वाढावी यासाठी अशा प्रकारचे मेळावे होणे आवश्यक आहे... छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाड्या-वस्त्यांमधील महिलांनी पुढे नेणे गरजेचे आहे... वेळप्रसंगी अन्यायाविरोधात लढण्यासाठी तलवार काढली पाहिजे...

निवडणुका जवळ आल्यावर अनेक योजना सुरु झाल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचादेखील समावेश आहे... या योजनेतून अनेक महिलांना दीड हजार रुपये मिळाले..  परंतु कांदा, बटाट्यासह लसणाचे दर गगनाला भिडले आहेत, महागाईची झळ महिलांना प्रचंड बसली आहे... नुसते पैसे देऊन चालणार नाही, तर महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे... पंधराशे रुपये देण्यापेक्षा मुलींना पंधरा हजार रुपये कमविण्यासाठी स्वावलंबी बनवा... त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन खुले करून द्या, अशी संतप्त टीका चित्रलेखा पाटील यांनी केली... त्या पुढे म्हणाल्या, निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालण्याचा प्रकार घडतो... त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो... दारुमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात... हे रोखण्यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी महिलांनी जागरुक राहिले पाहिजे...आपल्या मुलांनादेखील पालकांनी शिकविले पाहिजे... तरच समाजात अमूलाग्र बदल होईल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले...

पुरोगामी विचारांना पाठबळ द्या-अ‍ॅड. मानसी म्हात्रे 

ही भूमी संघर्षाची असून, याच भूमीत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला... या भूमीने ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करायला सरकारला भाग पाडले.... प्रभाकर पाटील यांच्यासह याच भूमीने महिलेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले...मीनाक्षी यांच्या रुपाने महिलेला मंत्रीपद दिले... जयंत पाटील, पंडित पाटील यांना घडवून त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना मिळाले... याच भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत... शोषित, पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे... सरकारविरोधात एल्गार देण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी हा महिलांचा संवाद मेळावा भरविला आहे...आपली वज्रमूठ एक करून पुरोगामी विचारांना पाठबळ द्या, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले..

अ‍ॅड. म्हात्रे यांनी सांगितले, देशासह राज्यात गेल्या सहा महिन्यांत अत्याचाराने कळसच गाठला आहे... शाळकरी मुलींपासून महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकण्याचे काम केले आहे... अन्याय, अत्याचाराची प्रकरणे दाबण्यासाठी सरकार पंधराशे रुपये देऊन महिलांची किंमत लावत आहे... हे पंधराशे रुपये मिळण्यासाठी महिलांना रोजगार गमवावा लागला... या पंधराशे रुपयांनी हातातले काम काढले... ही भयावह परिस्थिती आहे...

निवडणुकीचे पडघम वाजताच अवास्तव योजनांचे गाजर दाखविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे... ‘एक गणवेश, एक राज्य’ हा निर्णय घेतला आहे... परंतु, त्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे...लोकप्रतिनिधींसह सरकार या गणवेशांवर टक्केवारी घेत असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप म्हात्रे यांनी केला... पुढे त्यांनी सांगितले, आता ही हुकूमशाही, दादागिरी चालणार नाही... मॅन केलेली तलवार काढण्याची वेळ आली आहे...महिलांना उद्योगात समान हिस्सा, अधिकार द्या... त्यांना विकासाची दिशा ठरविण्यासाठी निर्णय प्रक्रियेत घ्या... महिलांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सक्षमपणे काम करायचे आहे, असे आवाहन म्हात्रे यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post