सेवेकरी तरुणांचे अथक, अखंडित आणि अविश्रांत परिश्रम!
रोहा - प्रतिनिधी :- रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांची रवीवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळयाची सांगता दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी झाली....शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधुभेटी करीत २९ तासांनंतर देव मंदिरात परतले, यावेळी रायगड पोलिसांच्या पथकाने श्री धाविर महाराजांना पुन्हा सशस्त्र मानवंदना दिली... महाआरती आणि सेवेकऱ्यांचे मानपान कार्यक्रमानंतर पालखी उत्सवाची सांगता झाली, उत्सवात सेवेकरी तरुणांनी अथक, अखंडित आणि अविश्रांत परिश्रम घेतले...
एका कुटुंबातील सोहळ्या प्रमाणे अवघ्या गावाचा एक आगळा वेगळा उत्सव असलेल्या या उत्सवात पालखी बरोबर हजारो भक्तगणांनी रात्र जागून काढली, समेळ वाद्य, हळगी, खालुबाजे, झांज पथके, ताशे, अलिबाग आणि रोहा येथील नगारे पथकां या उत्सवाची शोभा वाढविली, तर हजारो भक्तांच्या सोबतीने श्री महाराजांच्या पालखीने रोहा नगरीची प्रदक्षिणा पूर्ण केली... यावेळी परंपरे नुसार मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीकडून रायगड पोलीस, महसूल विभाग, रोहा नगर पालिका, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी आदींसह तीस तीस तास पालखी उत्सवात अखंडपणे विविध प्रकारे सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांना प्रसादाचे नारळ भेट देत त्यांचे सन्मान करण्यात आले...
यावेळी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, महेश सरदार, प्रकाश पवार, लालताप्रसाद कुशवाह, संदीप सरफळे आदी ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते... जवळपास २९ तास चाललेल्या या पालखी सोहळ्यासाठी ट्रस्टचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, कार्यवाह भुपेंद्र धाटावकर, सहकार्यवाह दर्शन कदम, सहकार्यवाह निखिल अमृसकर, उपाध्यक्ष नितेश जाधव, कुमार पाशिलकर, खजिनदार सुरज राऊत, सहखजिनदार विनोद पवार आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्यात अविश्रांत परिश्रम घेतले...
- ट्रस्टने मानले पालकमंत्री सामंतांचे आभार -
रायगड पोलिसांकडून श्री धावीर महाराजांना देण्यात येणाऱ्या मानवंदनेचे पोलीस बॅंड पथक तसेच पोलिस कुमक वाढवून देण्याचे आश्वासन मागील वर्षी पालखी उत्सवात पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले होते, त्याप्रमाणे यंदा उत्सवात बॅंड पथकासह पोलिस कुमक वाढवून दिल्याने पालखी उत्सवाच्या समारोप प्रसंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मकरंद बारटक्के यांनी पालकमंत्री उदय सामंतांचे जाहीर आभार मानले...
- तरुणांची अनवाणी पायाने २९ तास पालखी सेवा -या पालखी सोहळ्यात उत्सव समितीतील काही पदाधिकारी, गावातील तरुण सेवेकरी आणि धावीर भक्तांनी 29 तास पालखी समवेत अनवाणी पायाने आपली सेवा रुजू केली, पालखीसाठी विविध सेवा देणाऱ्या काहींसह मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झाले होते. दोन दिवस कडक उन्हात आणि संध्यकाळी पावसात कशाची तमा न करता ही मंडळी पालखी समवेत सेवा देत होती, काहींच्या पायांना छोट्यामोठ्या जखमाही झाल्या. परंतु या तरुणांनी धावीर महाराजांचा जयघोष करीत पालखी दरम्यान आपली अखंडित आणि अविश्रांत सेवा रुजू केली...


