डोळा पाहू दे पंढरी, विठुरायाची नगरी
🎇🚩🚩🌅🌄🚩🚩🚩🌄
आषाढ काव्य वारी
*भाग 1*
*कोमसाप उरण शाखेचा उपक्रम*
*सौजन्य- श्री.अजय शिवकर*
(सचिव कोमसाप उरण)
जगाला कुतुहल असणारी, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी,
अध्यात्मिक आणि आंतरिक सुख देणारी वारी म्हणजे पंढरपूरची वारी.
ही वारी अवघडही आहे.. अगदी सहजही आहे.
*आमची संत मंडळी म्हणजे मनुष्य जीवनाचे भास्यकारच. हे जीवन क्षणभंगुर आहे. ते पण वेगवेगळ्या वाटेने वळणावळणाने जाणारे. या वाटा सुगम करणारी ही आनंदाची वारी.*
या वारीचा आनंद काव्यातून व्हावा , विठूरायाचा सहवास घडावा,
शब्द शब्दाने आपले आतंरंग विठूमय व्हावे , आपले जीवन भक्तीरसाने भरून निघावे म्हणूनच आपल्यासाठी ही *आषाढ काव्य वारी*
*भाग --१*
डोईवरी टोपी, गंध -बुक्का,तुलसीमाळ
गजर हरीनामाचा निघाला सावळ्याचा बाळ
भान हरपूनी गणगोत, हाती धरूनिया टाळ
पाठीवरी घरदार, पोटी तान्हूल रे बाळ
काट -कूट नका म्हणू नाही उन्हाचे चटके
तहानभूक नका म्हणू आम्ही विठूचे भटके
विठुराय उभा जेथे जाऊ आम्ही तेथे
कांदा -भाकर भरवाया विठू येऊनिया भेटे
कशी निखरली काया सूर्यदेवाच्या कृपेनें
कधी वर्षाव कृपेचा वरुण देवाच्या भेटीने
कधी रिंगणात या येऊनी पहा रे
नामघोष सावळ्याचा, ज्योत अंतरी पेटवारे
वारकरी विणे वस्त्र, हरीनाम हेचि सूत्र
सकळ आनंदी आनंद, सुखी भूमी पुत्र
आया -बाया, पोर-टर, वाट चालती थोर
ध्यास एक मनी त्यांच्या विठुरायाचा जागर
आज पहिला कळस, आले आले पंढरपूर
विठुरायाची हाक भिडे थेट काळजास
त्याचा कासावीस जीव, भक्ताच्या भेटीस
धाव घेई गाभाऱ्यातून विश्वि ठसावला विठ्ठल
जय हरी विठ्ठल
लीना विवेक
धुळे
२) *दर्शन विठूमाऊलीचे*
होई समाधान।पाहे विठू डोळा।
भाव असे भोळा। विठूपायी।।१।।
सार्थक जन्माचे। जे दर्शन घेती।
नेत्री अश्रु येती ।आनंदाचे।।२।।
गजर नामाचा। टाळ मृदंगात।
धुंद ते नामात। वारकरी।।३।।
मस्तक चरणी । पंढरी येऊनी।
दर्शन घेऊनी । ठेवियले।।४।।
जन्माचे सार्थक। टेकविता माथा।
विलिनता आता। चरणाशी।।५।।
जय हरी नाम । विठ्ठल गजर।
विठूचा जागर। नित्य होई।।६।।
संसार सागरी। नामात राहूनी।
संकटे साहूनी । पार करु।।७।।
निर्मळ नितळ। दयेचा सागर।
भक्तांचे आगर । पांडूरंग।।८।।
नित्य असू देत।आम्हावरी कृपा।
भक्तांचा तू नृपा ।दयावंता।।९।।
सौ. दिपाली प्र. कांदळगांवकर, ठाणे
३) *आम्ही वारकरी*
*अभंग*
चला जावू वारी
देवाचीये द्वारी
पंढरीसी जाता
विठ्ठल कैवारी..
***
नेमाची ती वारी |आम्ही वारकरी
निघालो पंढरी|आनंदानेll
पंढरीची ओढlलागलीजीवास
साऱ्या जीवा ध्यासlपांडुरंग ll
एकत्र चालले l वारकरी सारे
दंग झाले पुरे lभजनातll
नाही काही भेद lनाही काही तंटा
सोडवितो गुंता lविठुरायाll
सारे राव गाव l स्वागत करिती
साऱ्यांच्याच चित्तीlएकभावll
आम्ही वारकरीlचाललो चाललो
एकरूप झालो lनामामधेll
आम्ही वारकरीlजातो पंढरीस
जीव कासावीस lदर्शनासll
किरण जोशी,
दिघी,पुणे
४) 🚩 वारी 🚩
कैवल्यांचा नाथ तो
माझा सखा पांडुरंग ,
टाळ - मृदुंगाची थाप
सारे वारकरी दंग ॥१॥
आषाढी एकादशी द्वारी
चाले तुका ज्ञानियेची वारी ,
विठु नामात रंगली
माझी पंढरी ही सारी ॥२॥
कोणी रंक नाही राव
विठु नामाचा हा ध्यास,
वाटेवरी होतो मला फक्त
माझ्या विठूचा हा भास ॥३॥
पंढरीचा हा सावळा
माझ्या रुक्मिणीचा हरी ,
सार्या दुखाःचा विसर
फक्त पंढरीची वारी ॥४॥
समय प्रस्थानाचा येता
हाले कळस आंळदीचा ,
भेटी लागली ही जीवा
माझा राजा पंढीराचा ॥५॥
पंढरीची ही वारी जणू
आहे संमिधराची लाट ,
युगे युगे पाहते मी
माझ्या विठूची ही वाट ॥६॥
- रोशनी दाभाडे
६) *पंढरीच्या हो वारीला*
हो.. जाऊ चला जाऊ चला, पंढरीच्या हो वारीला
हाती टाळ मृदुंग विणा, मुखी विठ्ठल विठ्ठल बोला
हो... जाऊ चला //धृ//
डोळे भरून पाहू चला, पंढरीच्या सावळ्याला
कपाळी शेंदूराचा टिळा, वैष्णव भक्तीत रंगला
झिम्मा फुगडी खेळू चला, भेट दे रे बा विठ्ठला
हो... जाऊ चला //1//
हाती चोपड्या घेऊन, करू चरित्र लेखन
वैष्णवांचे संगतीत, आलवू देवाचे भजन
वारकरी घालतो रिंगण, मनी विठ्ठलाचे ध्यान
हो...जाऊ चला //2//
तुका अभंगी वदला, नामदेव कीर्तनी गर्जला
समतेचा संदेश दिला, मानवाच्या उद्धरण्याला
दृष्ट भाव हा सारला, जगी मैत्री भाव वाढविला
हो...जाऊ चला//3//
गळा हार तुळशीमाळा, वारकरी विठ्ठल नामात दंगला
जमला वारकऱ्यांचा मेळा, चंद्रभागेच्या तिराला
साधू संतांच्या भूमितला, स्वर्गीय सुखाचा सोहळा
हो...जाऊ चला //4//
श्री नरेश गणपत पाटील
अलिबाग
६) *भक्तीचा पाऊस*
भक्तीच्या पावसात | चिंब वारकरी |
पांडुरंगाच्या ओढीने | धावती माळकरी ||१||
टाळमृदंगाचा ताल | नाचती थोर-अबाल |
पालखीच्या बैलांचीही | ठेक्यावरी
चाल ||२||
अबीर-बुक्क्याचा टिळा | शोभिवंत भाळ |
गळी भागवतांच्या | तुळशीची माळ ||३||
सरली अठ्ठावीस | चिरंतन भक्तीस |
गंगेपरी मान | माझ्या चंद्रभागेस ||४||
लाविली भाळी | गोपीचंदी तीट |
अढळ वाळवंटी | पुंडलिकाची वीट ||५||
नाही भेदाभेद | नाही स्वार्थी मेद |
उ्च्च-नीचतेला येथे | भागवतांचा छेद ||६||
ज्ञानियाची ज्ञानेश्वरी | तुकयाची गाथा |
करूनि पारायणे | तुकविती माथा ||७||
प्रकाश राजोपाध्ये,
खोपोली
विठ्ठल विठ्ठल । मुखी नाम यावे ।
चित्ती माझ्या व्हावे । स्थानापन्न ।।
देह नाशिवंत । नको मोह याचा ।
नको असत्याचा । मार्ग मज ।।
अहंकारातून । मज मुक्त कर ।
पाप माझे हर । पांडुरंगा ।।
पंढरीचे सुख । येथेची मिळावे ।
दान आज द्यावे । पामरास ।।
विश्व कल्याणार्थ । कार्य मज घडो ।
सर्वथा नावडो । राग लोभ ।।
नको अवगुण । नको वैरभाव ।
पैलतीर नाव । जाऊ देत ।।
दीन नको कोणी । नको कोणी राव ।
दिसो समभाव । निरंतर ।।
नदी व्हावी शुध्द । जीवन देण्यास ।
दुःख हरण्यास । पोशिंद्याचे ।।
अजू बाळ तुझा । तुज देतो हाक ।
मिटवून टाक । वैरभाव ।।
अजय रमेश चव्हाण
तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
८) *वारी...भेटीची आस...!!*
पुण्यवान वारकरी
निघे जाण्या पंढरीत
वैष्णवांची गाठभेट
माऊलीच्या नगरीत..१
पायी चाल अविरत
मुखी रामकृष्ण हरी
नाही कसला आळस
जरी पावसाच्या सरी..२
ओढ अनावर होई
दर्शनाची लागे आस
दिन हाच सोनियाचा
हर एक क्षण खास..३
वारी वाटे भगवंत
स्वतःअसे उपस्थित
तोच सांभाळी भक्तांना
मनी जागवुनी प्रीत..४
विटेवरी राऊळात
दिसे जेव्हा पांडुरंग
आनंदाश्रू उभे नेत्री
सार्थ जीवन अभंग..५
*सुचित्रा कुंचमवार*
*नवी मुंबई*
९) *डोळा पाहू दे पंढरी*
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी... २
टाळ-विणा चिपल्या संग, २
नाचू गाऊ होऊ दंग..
अभंगाच्या तालावरी
नाचतो श्रीहरी-
नाचतो श्रीहरी
डोळा पाहू दे पंढरी
विठु-रायाची नगरी... २
चंद्रभागेच्या डोहात
पाप होई नायनाट
येऊनी जन्मावरी
पहावी ही पंढरी-
पहावी ही पंढरी
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी... २
भीमाईच्या काठावरती
उभी सावळी सुंदर मूर्ती
भार अखंड, वाहे शिरावरी
सावळा श्रीहरी..
सावळा श्रीहरी..
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी... २
ज्ञानोबाचे ज्ञान घेऊ
तुकोबांच्या ओव्या गाऊ
रंगून जाऊ एकनाथ आणि
नामदेवा परि.
. नामदेवा परि
डोळा पाहू दे पंढरी,
विठु-रायाची नगरी... २
माथी अबीर बुक्का लावू
पायी संताच्या लीन होऊ
चला होऊ वारकरी
रामकृष्ण हरी
बोला रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी 5
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ...
.. श्री ज्ञानदेव तुकाराम !
पंढरीनाथ.... महाराज
कि जय !!!!
अजय शिवकर
केळवणे पनवेल
१०) *आलो दर्शनाला*
आलो दर्शनाला तुझ्या विठुराया
तुझ्या भेटीसाठी शिणली काया
नतमस्तक झालो तव चरणाशी
पडतो वाकूनीच मी तुझ्या पाया
रंजलो गांजलो पिचलो दुःखाने
भर विठुराया झोळी ही सुखाने
आलो शरण ही आस दर्शनाची
एकरूप असे तुजशी तनमनाने
नको अव्हेरूस ठेव चरणापाशी
गुंफतोय नाते तुझ्याच नावाशी
राहीन जवळ करीन तुझी सेवा
द्यावे दर्शना मी राहिलो उपाशी
करतो वारी आषाढी कार्तिकीला
तुझ्या भेटीसाठी आलो पंढरीला
दान दर्शनाचे राहूदे मज गाठीला
सावळ्या श्रीहरी भोळ्या विठ्ठला
डोईवरी तुळस घेऊनी वारकरी
पंढरपुरात भेटते सुखाची पायरी
घास नैवेद्याला आणला प्रेमभरे
तव चरणी मिळू दे मज ओसरी
सौ. भारती सावंत
खारघर, नवी मुंबई
|| डोळा पाहू दे पंढरी, विठुरायाची नगरी ||
हे जीवन घेरलेय ते षड् रिपूंनी. काम, क्रोध.. लोभ.. मोह.. मद.. मत्सर या सहा शत्रूंना हरवणे भल्याभल्यांना शक्य नाही. अहंकार तर क्षणोक्षणी उफाळून येतो. या षड्रिपूवर विजयासाठी वारी. ही पंढरी वारी आत्मविश्वास निर्माण करते. परमेश्वरावरचा श्रद्धाभाव दृढ करते. समुहात एकत्रितपणे असेल त्या परिस्थितीत ऊन ..वारा.. पावसाचा सामना करत पायी चालायला.. राहायला शिकवते. सुखी व्यवस्थेचा सदैव पाठलाग करणाऱ्या मनुष्याला निसर्ग सहवासातील साध्या नाविण्यपूर्ण जीवनाचा आनंद देते...आषाढ काव्य वारी..
भाग २
*कोमसाप उरण शाखेचा उपक्रम*
*सौजन्य- श्री.अजय शिवकर*
(सचिव कोमसाप उरण)
|| डोळा पाहू दे पंढरी
वारीचा काव्यातून विठूरायाचा सहवास घडावा, शब्द शब्दाने आपले आतंरंग विठूमय व्हावे , आपले जीवन भक्तीरसाने भरून निघावे म्हणूनच आपल्यासाठी ही आषाढ काव्य वारी
*भाग --२*
१) वारी
चाललो मी पंढरी
विठूरायाच्या दरबारी
भोळ्याभक्तीचा मनी भाव
असा मी एक वारकरी ||
चाललो मी पंढरी
उभी अठ्ठाविस युगे माझी माऊली
गजर हरी किर्तनाचे स्वर
दिसे सावळे रुप गाभारी||
चाललो मी पंढरी
तिथे नामदेवांची पायरी
माथा टेकीन मी भक्तीने
आमुची आनंदाची वारी||
चाललो मी पंढरी
भाव भक्तीचा जागर
रिंगणात विठूराया
वैष्णवांचा हा सागर||
चाललो मी पंढरी
दर्शने अश्रू येती नयनी
देवा सांभाळ लेकरे
प्रार्थना ही तुज चरणी|| .
श्री. किशोर परशुराम म्हात्रे
कर्जत
२) *संत निवृत्तीनाथ*
*अभंग*
मा पिता वास्तल्ये । भावंडास ळला ।
भोगी द्वेषकला । पित्रुबंधू ।।
महदभाग्य ते । दिक्षा नाथ पंथे ।
श्री गहिनीनाथे । गुरु दिक्षा ।।
योग अद्वेतांचं । कृष्णाचे अभंग ।
नाम भक्ती दंग । विठू पायी ।।
अकाली उडाले । मातृ-पितृछत्र ।
ज्येष्ठ ज्ञाता पुत्र । श्री निवृत्ती ।।
अध्यात्म धनाचे । दान ज्ञानदेवा ।
करा धर्मसेवा । अज्ञायिले ।।
आदेशी ज्ञान्यास । संस्कृत गीतार्थ ।
बोधावा गुह्यार्थ । सोपे सोपा ।।
भावार्थ दीपिका । लिहा ज्ञानेश्वरी ।
माने आज्ञा हरी । ज्ञानदेव ।।
विकार निवृत्ती । तेव्हा ज्ञान मिळे ।
सोपा नव्हे कळे । मुक्ती मार्ग ।।
ज्येष्ठ द्वादशीला । समाधिले स्वारी ।
प्राप्त मुक्त चारी । त्र्यंबकेसी ।।
*सचिन राम ठोंबरे*
*कलोते खालापूर रायगड*
३) *आषाढीची वारी* (अभंग)
पायी पायी चाले/ दंगुनिया सारी//
आषाढीची वारी / पंढरीला//१//
विठ्ठलाचे नाम/ सदा घेता मुखी //
भक्तजण सुखी/ मनोमनी//२//
दर्शनाची आस/ ठेवुनिया ध्यानी//
गोड गायी वाणी/ वारकरी//३//
सावळा तो हरी/ उभा विठेवरी//
चंद्रभागे तिरी/ भक्तांसाठी//४//
टाळ विणा हाती/वाजवी मृदुंग//
भजनात दंग/ भक्तजण//५//
पांडुरंगापुढे/ एक होती सर्व//
विसरुनि गर्व/ उच्च निच//६//
सर्वां लाभो सुख/ घालते साकडे//
विठुराया पुढे/लीनपणे//७//
----------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे
मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे
४) आनंद वारी
आषाढी कार्तिकी । पंढरीच्या वारी
विठ्ठलाच्या दारी । भक्तगण।।१ ।।
गावा गावातून । निघे वारकरी
पंढरीच्या वारी । पायी पायी ।।२।।
नसे भय चिंता । ऊन पावसाची
ओढ ही भेटीची।विठ्ठलाच्या ।।३।।
पांढऱ्या पोशाखी। शोभे वारकरी
आनंदाच्या वारी । चालताना ।।४ ।।
ज्ञाना तुकयाचा । करीत गजर
चाले वाटेवर । पंढरीच्या।। ५ ।।
चंद्रभागे स्नान । पंढरी निवास
भेटीचा हा ध्यास।विठ्ठलाच्या ।।६।।
पंढरीच्या वारी ।नसे जाती भेद
भेटीची उमेद । सर्वांलागी ।।७ ।।
तुज भेटण्यासी । येती वारकरी
ईच्छा पूरी करी । त्यांची देवा ।।८।।
पंढरी निवासी । विठ्ठल सावळा
भक्तांवरी लळा । लावतसे ।।९ ।।
जाता पंढरीसी ।भेटी विठ्ठलासी
आनंद मनासी । वाटतसे ।।१०।।
कवी- पी.जी.ठाकूर. उरण
रायगड .
५) *अभंग*
*माझा पाठिराखा पांडुरंग*
असे पाठिराखा। माझा पांडुरंग।
जीवे भरी रंग। माझ्या सदा ।।१।।
पुढती लागून। मार्ग दाखविला।
रस्ता चुकविला। गैरमार्ग।।२।।
विचार कल्लोळ। मनी दाटे जेव्हा।
शांत केले तेव्हा। नाम घेता।।३।।
फसता कधिही। संकटांच्या खाई।
धावे माझी आई। विठाबाई।।४।।
जन्माचा होतो मी। अभागी, करंटा।
वाजविली घंटा। भाग्याचिया।।५।।
भरून पावलो। पंढरीच्या नाथा।
गातो तुझी गाथा। सत्यवान।।६।।
प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
ठाणे
६) *विठ्ठल सावळा*
*विठ्ठल सावळा l रखुमाईसंगे l*
*भजनात रंगे l भक्तांसवे ll*
*भजन, पूजन l टाळ नि अभंग l*
*भक्त सारे दंग l किर्तनात ll*
*तुळशीच्या माळा l घालुनिया गळा*
*जणू दिसे मळा l भक्तीचा हा ll*
*तुझ्या दर्शनाने l होई मन शांत l*
*जीवाचा आकांत l लोप होई ll*
*होता पायी लीन l पुरे होई काम l*
*हेची चारधाम l पांडुरंग ll*
*देवा, विठुराया l सर्वांना तारणे l*
*एकची मागणे l तुजपाशी ll*
*विठू माझा सखा l विठ्ठल सोबती l*
*करूया आरती l जिवेभावे ll*
*पंढरपूरची l वारी भाविकांची l*
*कामना मनाची l पूर्ण करी ll*
*llजय जय विठ्ठल रखुमाई ll*
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे
७) *पंढरीची वारी !*
विठ्ठलाचे भक्त । नाना नगरीत ।
येती पंढरीत । *वारीसवे* ।।
ठेवुनी मनात । विठ्ठल ध्यानात ।
करती जोशात । *वारी पूर्ण* ।।
दिंड्या व पताका । थाट पालखीचा ।
घोष माऊलीचा । *वारीमध्ये* ।।
आळंदी जेजुरी । करीत वाखरी ।
पोहचे पंढरी । *वारी नीट* ।।
उभी आणि गोल । होतात रिंगणे ।
डोळ्यांचे पारणे । *फेडी वारी* ।।
भारुड नर्तन । आणिक फुगडी ।
भक्तीभावे उडी । *वारीतच* ।।
भजन कीर्तन । चिंतन मनन ।
तृप्त होई मन । *वारीमध्ये* ।।
होई तो गजर । टाळ मृदुंगाचा ।
विठूच्या नामाचा । *वारीभर* ।।
एक होई कैसा । अवघाची रंग ।
वारकरी दंग । *वारीत तो* ।।
हरीच्या नामाने । हरपते भान ।
मिळे समाधान । *वारीमुळे* ।।
विठूच्या दर्शने । होई परिपूर्ण ।
सुफळ संपूर्ण । *वारीऐसी* ।।
**************************
प्रविण शांताराम ,पनवेल, रायगड
८) विठ्ठल
वाळवंटी देवा ,उभा विटेवरी
भेटण्या रे देवा, आले तुझ्या दारी
भक्त सारे विठ्ठला,आले तुझ्या घरी
भरले पंढरपूर,घडली यंदा वारी
असे अबीर गुलाल,असे माळकरी
टाळ चिपळ्या संगे,दंग वारकरी
पाऊले चालती, नेहमी तुझी वारी
दुमदुमली आज, माझी पुण्यनगरी
असे नामाचा गजर,चंद्रभागा तिरी
मेळा भक्तांचा, भरला या घाटावरी
भेट तुझी झाली,तुझ्याच मंदिरी
सुखी ठेव देवराया,मुले बाळे सारी
प्राची दिनेश कर्वे
९)पंढरी
चला जाऊ पंढरीला
आषाढी एकादशीला।ध्रु।
पालखीचे अपूर्व दर्शन
अश्रू नयनी वंदिता चरण
टाळ मृदुंग ऐकायला
चला जाऊ पंढरीला।१।
गाऊ नाम विठूमाऊलीचे
प्रेम वृक्षाच्या साऊलीचे
विठ्ठलाच्या दर्शनाला
चला जाऊ पंढरीला।२।
चंद्रभागेत करून स्नान
गाऊ देवाचे भक्तिगान
संत जनाच्या या माहेराला
चला जाऊ पंढरीला।३।
संजीवनी मोकाशी
बोरीवली
१०)🚩🚩 *आषाढ काव्य वारी*🚩
निघाली सकाळ। करण्यास वारी।
तुळस मंजिरी। घेऊनिया॥
बहुगुणी रोप। ऑक्सिजन बाग
क्षमविते आग। चालताना॥
चाले वारकरी। पंढरीची वाट
किती वर्णू थाट। वैष्णवांचा॥
मी विठूरायाचा। झालो वारकरी।
ध्वजा खांद्यावरी। भाग्वताची ॥
पाहिली पंढरी।आज मी सकाळी।
टिळा शोभे भाळी। विठ्ठलाच्या॥
विठ्ठलाच्या संगे।उभी रखमाई।
आशीर्वाद देई।भक्तगणा॥
आषाढी वारीला। भेटे विठूराया।
पडतो मी पाया। भक्तीभावे॥
तृप्त झाला म.का। पाहता पंढरी।
बोलते वैखरी। वैष्णवांची॥
*श्री.मच्छिंद्रनाथ का.म्हात्रे*
वशेणी -उरण -रायगड
*|| डोळा पाहू दे पंढरी, विठुरायाची नगरी ||*
*आषाढ काव्य वारी*
*भाग ३*
*कोमसाप उरण शाखेचा उपक्रम*
*सौजन्य- श्री अजय शिवकर* (सचिव कोमसाप उरण)
*विठुरायाच्या वारीमध्ये नित्य शक्य नसलेले हरिपाठ,प्रवचन किर्तनातील अमृतानुभव, अखंड नामस्मरण संस्कृती संस्कार यामुळे या जीवनाचे रहस्य समजते. अहंकार नष्ट होत, मन निर्मळ होते. जीवनात आमुलाग्र परिवर्तन होते. ज्या श्रद्धेवर जीवन चालते तो श्रद्धाभाव या वारीत विकसीत होतो. यावरच्या श्रद्धेवरच या जगाचे व्यवहार चालतात*
*इथे असलेल्या प्रचंड गर्दीत समोर दिसणाऱ्या प्रत्येकामध्ये विठ्ठळच दृष्टीस पडतो. प्रत्येक जिवाचे अंतरंग.. मूळ स्वरुप.. आत्मा हा पवित्र असा विठ्ठळच आहे हे इथे पटते. मग समोरच्यामध्ये विठ्ठल दिसला की आपली वागणूक बदलून हे जगच आनंदी वाटते. एकदा तुळशी माळ घातली की नित्संग होणे जमते.*
*वारीत होणाऱ्या नामगजराने जगाचा विसर पडतो. संताना अनन्यभाव शरण जाणे साधते. त्या संतांचे विशाल मन भक्त मनात प्रवेशते.*
अशी ही आषाढ वारी आणि विठुरायाच्या अमृतमय भक्तीने ओथंबून भरलेल्या कोमसापच्या साहित्यिकांच्या काव्यरचना
*भाग -३*
१) पांडुरंग (अभंग)
पांडुरंग माझा |भक्तीचा भुकेला |
टाळ मृदुंगाला | आनंदला||१||
संतांचा मेळावा |त्याच्या चरणाशी |
जना उद्धारीशी | आशिर्वादे ||२||
एकोप्याची वारी| वारकरी दंग |
भजनात गुंग | भक्तगण ||३||
शाळाही पंढरी | विठ्ठल विद्यार्थी|
घडवू ज्ञानार्थी | सेवाव्रती ||४||
शाळा फुलवूनीू| संस्काराची शिधा |
करण्यास सदा | उपकारी||५||
दर्शनाची आस | मन घाली साद|
माऊलीचा ध्यास | अंतरंगी ||६||
ऋतुजा म्हणे | हिच विनवणी |
रहावी धरणी | आनंदीत ||७|
सौ.ऋतुजा रवींद्र गवस
नवी मुंबई
२) *माझी पंढरीची आई*
कुठे शोधू विठुराया
साक्ष मिळे चराचरी
गाभाऱ्यात धूप दीप
मूर्ती नाही विटेवरी •••१
विटेवर उभी माय
पाहे लेकराची वाट
नाही माऊली मंदिरी
डोळ्यातून वाह पाट•••२
बघा पालथी घातली
सारी विठूची पंढरी
कुठे शोधू विठुराया
माझ्या सावळ्या श्रीहरी •••३
निघे धुंडत धुंडत
कुठे दिसेचना हरी
वाऱ्यासवे धाव घेई
राधा कावरी बावरी •••४
वारी संगे चालताना
दूर दिसे पांडुरंग
टाळ चिपळ्यांच्या सवे
होता नाचण्यात दंग •••५
गेली शोधत शोधत
मज गवसला हरी
भक्तासंगे आनंदाने
खात होता तो भाकरी •••६
घास माझ्या मुखी देई
माझी पंढरीची आई
माझ्या डोळ्यात पाहिली
त्याने इवली मुक्ताई •••७
कवयित्री -जयश्री चुरी.
दादर, मुंबई.
३) 🚩आषाढ वारी 🚩
आला आषाढाचा मास
लागे मनाला ती आस
कधी पाहिन देवास
भुक लागली डोळ्यास ||
खांद्या घेऊ वळकटी
टाळ मृदुंग हे पाठी
जाती सारे पायी पायी
माझ्या विठू रायासाठी ||
केला होता अट्टाहास
कुठे शोधु विठुराया
जना जनात दिसतो
रूप तुझे देवराया ||
चंद्रभागेच्या पाण्यात
पाप धुऊन हो जाती
भाळा वरी मी लाविन
पंढरीची हो ही माती ||
मज आठवे विठ्ठल
वारकरी पंढरीचा
ध्यानी मनी एक छंद
मुखी चाळा रे नामाचा ||
तुझी भेट झाल्या विना
चैन पडे नाही मना
दुर वरून मी आलो
माथा तुझ्याच चरणा ||
वासुदेव फडके खेरणेकर
पनवेल रायगड
४ *आषाढी एकादशी*
आषाढमासी एकादशी
देव जाती शयनासी |
दिंडी निघाली भक्तगणांची
पंढरीशी ||
पंढरीचा पांडुरंग
त्याच्या भजनात दंग |
वारकरी हा करी जयघोष
रुक्मिणी श्रीरंग ||
ज्ञाना तुका एका नामा
पालखी निघे पंढरीधामा |
आनंदोत्सव हा जाहला
संत समागमा ||
वैष्णवांचा भरला मेळा
जगावेगळा असे सोहळा |
जात, धर्मभेद प्रवाद
गेला रसातळा ||
संतांचे माहेर पंढरी
आई रुक्मिणी बाप श्रीहरी |
घास भरवी अमृताचा
भक्तालागी ||
अमृत म्हणजे संतवचन
तयागुणे देहाचे जाण |
होई बावनकशी सोने
या जगती ||
दिलीप रामदास मोकल.
हाशिवरे अलिबाग
५) विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा
डोळे भरून पहातच रहावे
विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा।
पंढरपुरात पावा स्नेह भक्तांचा
दरबार भरे भगवंत विठ्ठलाचा ॥
नित्य आषाढी-कार्तीकी वारी
स्नेहसंमेलन विठ्ठू भक्तांचा।
भिमा-चंद्रभागा भरून वाहे
गोतावळा विठ्ठल भक्तांचा ॥
भाग्यवंता घडो सेवा सहवास
मायबाप कृपालु पांडुरंगाचा।
करकटेवर, कर्णकुंडले मत्स्याची
तुळशीहार गळा, टीळा चंदनाचा ॥
तेजस्वी रूप गोजिरे
रंग कृष्णधवल विठ्ठलाचा।
माथी शोभून दिसे
मुकुट हिरे जडीत मोत्याचा ॥
भेट घडो सदासर्वदा
मनी भाव विठ्ठलाचा।
डोळे भरून पहातच रहावे
विठ्ठल मायबाप त्रैलोक्याचा ॥
श्री.संतोष गणपत पाटील
पनवेल, रायगड
६) *विठ्ठला जीव जाहला खुळा*
हात कटेवर तसा विटेवर किती युगे तू उभा
तुझिया चरणी तेज अर्पुनी नित्य उजळते प्रभा
भाव रुजवला आत फुलवला तुझ्या भक्तीचा मळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !
किती स्मरावे किती जपावे नाम तुझे रे मनी
क्षणाक्षणाला हर्ष मनाला आत जागते जनी
विठ्ठल विठ्ठल नामाचा या किती लागला लळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !
श्वास कोंडला ध्यास वाढला धाव अता सत्वरी
जीव तरेना धीर धरेना प्राण तळमळे उरी
उभी अंतरी तुझी पंढरी उत्सव हा आगळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !
घरात तू अन चरात तू रे तूच हृदय मंदिरी
जन्म हसे वारीत फसे हा सोडव तू श्रीहरी
भेट तुझी ही थेट घडावी रंगव हा सोहळा
विठ्ठला जीव जाहला खुळा !
वैशाली माळी.
७) *भक्तिमय वातावरण*
आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //
विठ्ठल विठ्ठल, गजरात स्वागत जनी
टाळ चिपळ्यांचा ,गुंजतो गोड स्वर कानी
वारकरी पंथ , तुळशी माळा गळा धारी ……. //१//
आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //
रिंगण सोहळा, इंद्रायणीच्या तीरी मेळा
प्रफुल्लित सारे , भक्तगण झालेत गोळा
विठ्ठल माऊली, दर्शनाची येई उभारी ……… //२//
आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //
विठ्ठल नामात ,पाय नाचता जागे शक्ती
पाहे विठूराया , पंढरीच्या वारीत भक्ती
श्रध्दा व सबुरी, लीन झाली चरणी सारी ……… //३//
आषाढी कार्तिकी, निघाली पंढरीची वारी
वैष्णवांचा मेळा, निनादली ती भक्ती भारी…. // धृ //
सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर
८) *भक्तीचा सागर*
विठ्ठल सावळा| मन मंदिरात||
छबी हृदयात|शोभिवंत||१||
सखा पांडुरंग|मायेचा सागर||
अंतरी घागर|नामामृत||२||
विठ्ठलाचे रूप| अंतरंगी राहो||
म्हणूनिया टाहो| फोडू आम्ही||३||
पंढरीसी आहे| माझे सुखधाम||
जीवाचा विश्राम| सावळा हा||४||
सावळा गोजिरा|माझा विठुराया||
विठुमय काया| व्हावी माझी||५||
भगवी पताका|घेऊनिया हाती||
वारकरी जाती| विठूसाठी ||६||
सचिन प्रेमाने|हरिनाम घेतो||
उजळून येतो|भक्तीरंग||७||
*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
९) *ll वारी पांडुरंगाची ll*
निघाली स्वारी l पायी पंढरी ll
दर्शन व्हावा l पांडुरंगा मज वारी ll
तान भूक हरपून l स्मरण तुझे अंतरी ll
दर्शन दे रे मज l या वैष्णवांच्या वारी ll
भान हर पुनी संसाराचा l जप नाम मुखी ll
आनंद मावेना गगना l होता देह सुखी ll
पहावा विठ्ठल l बोलावा विठ्ठल ll
हिच शिकवण अंतरी l मज घडावी सदा वारी ll
वेडी वाकुडी भक्ती माझी l अर्पून तुझ्या चरणी ll
सांभाळ मज या जन्मी l व्हावी आनंद वारी ll
पांडुरंग विठ्ठल l विठ्ठल वारी ll
दर्शन दे रे l दे रे मज दारी ll
श्री हेमंत पाटील मु.पाणजे ता.उरण
१०) *विठ्ठला (गझल)*
केवढा गोंगाट आहे भोवताली विठ्ठला
भासतो आहे मला मी एक कैदी विठ्ठला
लोटली सारी युगे भजनात माझी रे तुझ्या
पण तुझी-माझी अजुनही भेट नाही विठ्ठला
मानली नाहीस तूही एवढ्या भक्तांमध्ये
जात ही निर्माण केली सांग कोणी विठ्ठला ?
वाहु दे माझ्या मनातून चंद्रभागा नेहमी
या शरीराची घडू दे रोज वारी विठ्ठला
तू जिथे असशील तेथे ने मलाही विठ्ठला
बघ बरे वाटेल थोडेसे तुलाही विठ्ठला
शेवटी मी आत डोकावून माझ्या पाहिले
ती तुझी मूर्ती खरे तर आत होती विठ्ठला
कवी - काव्यकांत 'मन'
संपर्क - ७२१९४५०६९१
११) *वारी पंढरीची*
विठुरायाच्या भेटीची, इच्छा मनात भरली...
कोमसापच्या साथीने, वाट वारीची धरली..
रस्तोरस्ती अनवाणी, चाले वैष्णवांचा मेळा..
आस मनी माऊलीची, आळविती वेळोवेळा..
टाळ मृदंग गजरात,भक्त रंगुनीही जाती...
नसे जातीपाती मनी भाव, सर्व एकच नाचती...
गात भजने कीर्तने, नाम माऊली माऊली...
नाही शीण नाही ग्लानी, लीन होती ते
राउळी...
असा दिंडीचा हा सोहळा, अशी विठूची अपूर्वाई...
मन होऊनि निर्धास्त, धन्य झालो ठाई ठाई...
श्री.संजय जयराम होळकर
वाकण- पोलादपूर
१२) *वारकरी*
पंढरीच्या दारी,लाखों वारकरी
नामदेव आपला,स्वागत करी
दाही दिशा तुनी, रामकृष्ण हरी
ज्ञानातुकाचोखा तोच ताल धरी
देव भेटेल कधी, प्रश्न चेह-यावरी
जनासखुकान्होपात्रा,मुक्ताईअंतरी
आपले येणजाणे,असे कधीतरी
श्रध्दा रिंगणासारखी,देव अग्रेसरी
देव दयेचा सागर, उधळे लाटांवरी
स्वर्ग आपणा भेटेल, जेथे वारकरी
*रायगडभूषण प्रा एल बी पाटील*










