सोगांव - अब्दुल सोगावकर :
मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्वाचा व प्रमुख सण म्हणजे रमजान ईद. इस्लामी कॅलेंडर प्रमाणे रमजान हा नववा महिना आहे, या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव रमजान महिन्यात पूर्ण महिनाभर उपवास (रोजे) करतात, या दिवसात दररोज नमाज पठणाबरोबर कुराणाचे पठण, प्रार्थना व संध्याकाळी विशेष तरावीची नमाज पठण करण्यात येते. तीस दिवसांच्या उपवासानंतर व शेवटच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विशेष रमजान ईदची नमाज पठण करत रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बुधवारी रमजान ईद चा चंद्रदर्शन झाल्याने गुरुवार दि.११ एप्रिल रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सकाळी विशेष नमाजासाठी अलिबाग शहरातील भाजी मार्केट येथील मदिना मशिदीमध्ये मोठी गर्दी केली होती, यावेळी अलिबाग पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग पोलिसांनी सहकाऱ्यांसोबत मदिना मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या. यावेळी मुफ्ती शकील सिद्धीकी, हाफिज सैफ सय्यद, इरशाद सय्यद, अब्दुल रौफ सय्यद, रईस सय्यद आदी मुस्लिम बांधवांनी अलिबाग पोलिस यांचे मनापासून आभार मानले..
फोटो लाईन : अलिबाग शहरातील मदिना मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना अलिबाग पोलिस,
छायाचित्र : अब्दुल सोगावकर
