महाराष्ट्र वेदभुमी

प्राचीन शिवमंदिर सोनगाव रोहा येथील स्वयंभू सोमेश्वर,शिवरात्र निमित्त विविध कार्यक्रम..

रोहा शहरापासून अगदीच कुंडलिका नदीच्या तीरापासून सोनगाव नावाचे छोटेसे गाव वसलेले आहे... पूर्वी ही नदी छोट्या कमानीवरून ओलांडून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगाव गावी जावे लागते . निसर्गरम्य परिसरात असलेल्या या गावाला तिन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. सोनगाव गावाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेवर ऐतिहासिक श्रीमंत अवचितगड किल्ला आपली श्रीमंती टिकवून आहे. पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग व त्यावरील उभा असलेला घेरासुरगड, दक्षिणेला बारमाही वाहणारी कुंडलिका नदी...रोहा शहरापासून सोनगाव ला जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता असल्याने आपणास रेल्वे क्रॉसिंग करून रोह्याच्या उत्तरेला असलेल्या सोमेश्वर देवस्थानास जाण्यासाठी आपल्याला वाहनाने थेट मंदिर परिसरात पोहचता येते..

येथील पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर स्वयंभू असून भक्तांची नितांत श्रद्धा मानली जात आहे.पूर्वी भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्वार सोनगाव ग्रामस्थांनी 1970 साली केला असल्याची समजले. (त्यापूर्वीची माहिती मिळू शकत नाही)  परंतु ब्रिटिश सरकार कडून मंदिर पुजाऱ्याला प्रतिवर्षी ठराविक रक्कम मानधन म्हणून दिली जात होती याचे कागदी पुरावे आजही उपलब्ध आहेत. सोमेश्वर देवस्थानासाठी ब्रिटिश अधिकारी विल्यम रॉबर्ट याच्या आदेश व सहीची सनद मोडी लिपी मध्ये आजही उपलब्ध आहे. तसेच मंदिराचे तत्कालीन पुजारी स्व.शंकर धोंडू जंगम यांच्या नावाची 18/03/1991 सालची तत्कालीन रोहा तहसीलदार यांच्या सहीची मानधन मिळत असल्याची पावती उपलब्ध आहे. सोमेश्वर देवस्थानला शासकीय निधी दिला जात होता यावरूनच या देवस्थानाचे महत्व आपल्याला अधिक सहजपणे लक्षात येते..

रोहा तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थानी पुन्हा एकदा कौलारू असलेल्या सोमेश्वराच्या या शिवालायचे   2015 साली  नव्याने RCC मध्ये सुंदर असं बांधकामं केल व मंदिराला सुंदर नक्षीकाम असलेला कळस चढवीला आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला ...

सोमेश्वर मंदिराच्या अगदी समोर आई भवानी मातेच मंदिर आहे.. सोमेश्वर मंदिराच्या पश्चिमेस पिंगळसई येथील शिव मंदिर व पूर्वेस मालसई येथील शिव मंदिर आहे, विशेष म्हणजे  महादेवाची तिन्ही मंदिरे एका सरळ रेषेत आहेत आणि केंद्रास्थानी स्वयंभू सोमेश्वर आहे...

विस्तीर्ण प्रांगण असलेल्या या मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मंदिराच्या समोर भव्य अष्टकोनी दीपमाळ असून तिच्यावर एक शिलालेख आहे (काळाच्या ओघात दिसत नाही ) व तिच्या शेजारी कालभैरवआहे.... मंदिरात प्रवेश करायच्या आधी आपलं लक्ष वेधल जात ते मंदिराबाहेर उभ्या असलेल्या नंदी कडे, सोमेश्वर मंदिर किती प्राचीन आणि वैभव संपन्न आहे हे आपल्याला ह्या नंदिकडे पाहिलं कि समजून येतो.. पूर्वी मंदिरात उभा असलेला हा नंदी जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी त्याला मंदिराबाहेर जतन करून ठेवला आहे, नंदी भव्य असून नंदीच्या अंगावर शृंखला आहेत व त्याचे दोन्ही कान व शिंगे तुटली आहेत, परंतु उभा आणि एवढा भव्य नंदी आपणास कुठे पहावयास मिळत नाही...मंदिराच्या उजव्या बाजूस तीन समाध्या आहेत (  पहिली समाधी वीरशैव धर्माचे शिवाचार्य यांची असून दुसरी समाधी त्यांच्या शिष्याची आहे व तिसरी समाधी सोनगाव मधील नारायण जंगम यांची असल्याची माहिती मिळते) सोनगाव गावात स्थायिक असलेल्या जंगम घराण्याच्या कुलबांधवांनी त्या बांधल्या असल्याची माहिती मंदिराचे पुजारी  जंगम देतात...

मंदिराच्या उजव्या बाजूला  ऊन वारा पाऊस यांचा सामना करत एक पाषाण मूर्ती सुस्थिती मध्ये आहे त्या मूर्तीला भुंडी (अपरिचित नाव) असे म्हणतात.. ह्या मूर्तिबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते कि जेंव्हा पाऊस पडत नसेल तेंव्हा निपुत्रिक व्यक्तीने त्या मूर्तीवर दगड ठेवल्याने पाऊस पडतो असं सांगितलं जात...

अतिशय सुबक बांधणीचे सभागृह आणि आतमध्ये गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्याबाहेर काळ्या पाषाणातील नंदी शिल्प असून नंदी उभा आहे संपूर्ण भारतात उभा नंदी असलेले शिवालय खूप कमी प्रमाणात आहेत... तसेच सांभामंडपात कासव प्रतिमा कोरलेली आहे...सभामंडपात आपल्याला डाव्या बाजूला विद्येची देवता श्रीगणेश, उजव्या बाजूला श्रीविष्णू व श्री मारुतीराया यांच्या सुबक व देखण्या मुर्ती आहेत... तसेच गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर गरुडदेवतेची प्रतिमा कोरलेली आहे.या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात असलेली भव्य स्वयंभू शिवपिंडी.(पाषानाची शिवपिंड जीर्ण झाल्याने ग्रामस्थानी २०२१साली शिवपिंडी ला वज्रलेप करण्यात आला आहे ) पिंडीवरील शाळुंखेवर पितळेचा शंभु महादेवाचा मुकुट आणि त्यावर तांब्याची नागफणी आहे. शेजारी भव्य त्रिशूल व त्यावरील रुद्राक्षांच्या माळा भक्ताचे लक्ष वेधून घेतात...  शिवलिंगावर अभिषेक व्हावा यासाठी कायम स्वरूपात गळती (मोठा गडू ) अडकवला आहे..शिवपिंडीच्या मागच्या बाजूस पार्वती मातेची सुंदर मूर्ती आहे..या मंदिरात नित्य पूजारी जंगम आहेत.त्यांच्या मार्फत दररोज सकाळी सात ते दहा या वेळात भाविकांसाठी अभिषेक, पूजा अशी कामे केली जातात..

स्वयंभू सोमेश्वर शिवलयात दर सोमवारी सायं भजन व आरती नित्यानेमाने केली जाते.दरवर्षी माघ कृष्ण तृतीयेला महाशिवरात्रीला येथे मोठा वार्षिक उत्सव साजरा केला जातो व मोठी यात्रा भरते.तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अभिषेक, पूजा,भजन, कीर्तन, नामजप असे कार्यक्रम असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12.00 राजाधिराज श्री सोमेश्वर महाराज यांचा भव्य पालखी सोहळा सुरु होतो,विशेष म्हणजे परंपरागत पालखी उचलण्याचा मान स्थानिक पोलीस पाटील यांचा असतो. श्री सोमेश्वराच नाव घेताना भक्तांकडून मोठ्या भक्तीभावाने राजाधिराजा श्री सोमेश्वर महाराज कि जय असा जयघोष केला जातो.. राजाधिराज सोमेश्वर महाराज आपल्याला घरी येणार म्हणून संपूर्ण गावात सजावट करून रांगोळ्या टाकल्या जातात व गाव सुशोभीत केला जातो...परंपरेपासून पालखी सोनगाव, धामणसई व गावठाण अशा तीन गावात फिरते...

सालाबादप्रमाणे दरवर्षी गावात गोकुळाष्टमीला टाळ मृदंगाच्या जागर सप्ताहाचे सात दिवस आयोजन केले जाते व गणपती मध्ये भागवत सप्ताह चे आजही अखंड पारायण केले जाते.महादेव मंदिर महादेववाडी (रोहा) येथे होणाऱ्या शिव पार्वती विवाह सोहळ्याचा घरो-घरी आमंत्रण देण्याचा मान सोमेश्वर देवस्थान चा असून सोमेश्वर देवस्थान ची काटी दरवर्षी  यात्रेसाठी महादेव मंदिर येथे नेली जाते.भक्तांच्या हाकेला धावणारा व भक्तांचे रक्षण करणाऱ्या राजाधिराज सोमेश्वरावर सोनगाव ग्रामस्थांची व तालुक्यातील भक्तांची नितांत श्रद्धा आहे...

✍️ माहिती संकलन✍️

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

श्री. योगेश जंगम

पोलीस पाटील -सोनगाव रोहा

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

Post a Comment

Previous Post Next Post