महाराष्ट्र वेदभुमी

दुचाकी स्वराचा कामथे घाटात अपघात.. अपघातात तरुण गंभीर जखमी

 


सोगाव अलिबाग: अब्दुल सोगावकर

ना गाव चा.. ना शिव चा...!! तरीही पिंट्या गायकवाड धावून आला त्याच्या मदतीला

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी खेड येथील कामथे घाटात झालेल्या अपघातात गंभीर जखमी तरुणाला केली मदत,

  अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड हे कुठेही, कधीही, कुणाच्याही मदतीला कोणताही स्वार्थ व हेतू न ठेवता मदतीला धावून जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांचे सामाजिक कार्य हे नेहमीच उल्लेखनीय व कल्पनेच्या पलीकडे असते. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेने नेहमीच मदत करतात, याच भावनेने खेड येथे अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावून आले आहेत..

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनाने सहकाऱ्यांसह कोकणात भराडी देवीच्या यात्रेला गेले होते. रविवार दि. ३ मार्च रोजी परतीच्या प्रवासात असताना खेड येथील कामथे घाटात भरदुपारी एक दुचाकी चालक दुचाकीसह रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला धडकून गंभीर जखमी झालेल्या व रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला, त्याचवेळी पिंट्या गायकवाड हे याच मार्गाने जात असताना त्यांनी अपघाताठिकाणी आपले वाहन थांबवत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच १०८ रुग्णवाहिका, व इतर अनेक रुग्णवाहिका यांना संपर्क साधला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यांनी लगेच वेळ न दवडता ज.न.म. संस्थानांच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता फक्त पाचच मिनिटात रुग्णवाहिका दाखल झाली, यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह इतरांच्या मदतीने सदर गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले... यावेळी पिंट्या गायकवाड यांच्या सोबत त्यांचे सहकारी नदीम आत्तार, विजय मोरे, इतर स्थानिक लोक उपस्थित होते...

   अपघातात  ज.न.म. संस्थानांने रुग्णवाहिकेची तत्पर सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थानाचे कौतुक केले... आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुध्दा अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला मदत केल्याबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचे रायगड जिल्ह्यात सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे...

फोटो लाईन : खेड येथील कामथे घाटात दुचाकी अपघातात जखमी तरुणाला मदत करताना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व इतर सहकारी,

Post a Comment

Previous Post Next Post