महाराष्ट्र वेदभुमी

लोणंद,जेजुरी,सासवड तसेच वाईच्या भक्तांची शेकडो वर्षांची परंपरा,रोह्यात श्री धावीर महाराजांचा माघ



रोहा दि ५ मार्च, प्रतिनिधी ;- 

साऱ्या जगाला पंढरपूरच्या वारीचे अप्रूप आहे... त्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाई तसेच जेजुरी, सासवड येथून न चुकता आपल्या कुटुंबकबिल्यासह नियमित श्री धावीर महाराजांच्या वारीला लोक येतात... साधारणपणे कोल्हाटी, वडार, डोंबारी व लोककला सादर करणारा समाज सुमारे दोनशे वर्षापासून श्री धाविराच्या दर्शनाला व स्वसंरक्षणासाठी कळा लावायला येथे येतात. पूर्वी दरवर्षी वारी करणारे हे भक्तगण सत्तर-बहात्तर सालानंतर दर तीन वर्षांनी माघ महिन्यात पौर्णिमेला येतात... यंदा देखील माघ पौर्णिमेस देवाची जत्रा साजरी करण्यासाठी भक्तांनी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत तसेच रोह्याच्या नदी संवर्धन समोरच्या मोकळ्या मैदानात राहुट्या टाकून आपला मुक्काम ठोकला आहे...

वारीला येताना हे लोक परंपरेने त्याच्या सोबत त्यांचा देव्हारा आणत असून त्या देव्हाऱ्यात कुलदैवता म्हणून इतर देवतांसोबत श्री धावीर महाराजांची सुद्धा स्थापना असते... त्यांच्या देव्हाऱ्यातील श्री धावीर महाराजांच्या टाकाला (मूर्तीला) धावीर मंदिरातील पुजारी शेंदूर लावून देवांची भेट घडवून आणतो... त्याबरोबर इतर धार्मिक विधी करुन गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो... माघ पौर्णिमेनंतर आलेले सर्व भक्त देवांना समुद्रस्नान घालण्यासाठी रेवदंडा येथे जातात, तिथे शीतला देवीचे, म्हसोबाचे दर्शन घेऊन श्री धावीर महाराजांची वारी पूर्ण होते...

पूर्वी हे लोक जेजुरी - सासवड-कोंढणपुर- पानशेत- लिंग्याचा घाट ताम्हिणी घाट ते कोलाड मार्गे रोहा असा पायी प्रवास करीत असत, आता स्वतःच्या वाहनातून येतात देवाच्या कृपेने घरात सुबत्ता आली आहे पण देवावरील भाव तिळमात्र कमी झालेला नाही... यातील बरेच लोक मोठमोठ्या सरकारी हुद्द्द्यावर काम करत आहेत. काहींचे स्वतःचे उद्योग आहेत...स्वतःची आलिशान घरे आहेत, पण श्री धावीर महाराजांच्या वारीला आल्यावर परंपरेने साध्या राहुटी मध्ये (झोपडीमध्ये) ही मंडळी राहतात... जेजुरी वरून येणारे वारकरी खंडेरायाच्या पालखीचे मानकरी असून साधारण ही मंडळी एकमेकांचे सगेसोयरे असल्याचे सांगण्यात आले... हा उत्सव साजरा करण्यासाठी कोल्हाटी समाजातील गणेश माळी, वैजनाथ माळी, मनोज लाखे, रवि लाखे, अशोक माळी, नामदेव लाखे, रघुनाथ जावळेकर, अनिल माळी, शंकर लाखे, मिठू लाखे, रोहन माळी, नितीन गाडे, गणेश गाडे, तेजस गाडे, सनी माळी, उमेश माळी, ऋषीकेश लाखे, अभिषेक माळी, दिपक लाखे, प्रथमेश लाखे आणि इतर सर्व तरुण मित्र सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले...


- रोहा वारीचा इतिहास -

सन १८१८ नंतर संपूर्ण हिंदुस्थाना वर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला होता. तरीही गावागावातील जातीपातीच्या, उच्चनीचतेच्या भिंती मात्र अबाधित होत्या. समाजातील काही घटकांकडे कायम संशयाने बघितले जायचे... त्यांना कायम दुय्यम स्थान दिले जायचे...श्री धावीर महाराजांची वारी करणारा हा समाज म्हणजे कोल्हाटी, वडार, डोंबारी व लोककला सादर करणारा आहे. त्यावेळी वाटेतील गावांत त्यांना तीन दिवसांच्या वर राहण्याची मुभा नव्हती... या समाजाचा तांडा गावात आला की, गावचा पाटील बरोबर तीन दिवसांनी त्यांना त्यांचा मुक्काम हलवायला भाग पाडायचा... अशा काळात या समाजातील काही जण पोटासाठी फिरत फिरत रोह्यात आले. आल्यानंतर सहजच श्री धावीर महाराजांच्या मंदिरात जाऊन श्री धावीर महाराजांचे दर्शन घेतले...पहिल्या भेटीतच त्यांना श्री धावीर महाराजांबद्दल जिव्हाळा व ओढ वाटू लागली... श्री धावीर महाराजांनी त्यांना आपलेसे केले होते. त्यांना आपल्या चरणी थारा दिला होता... गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यामागे तीन दिवसात गाव सोडण्याचा तगादा लावला नाही... ह्या आपलेपणाची शिदोरी घेऊनच त्या वर्षी ते आपापल्या गावी गेले... त्यावर्षी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोक रोह्यात आली होती... त्यांनी आपल्या सग्यासोयऱ्यांना व गावकऱ्यांना श्री धावीर महाराजांच्या प्रेमाच्या व आपलेपणाच्या गोष्टी सांगितल्या. बरोबर वर्षांनी त्यांना पुन्हा श्री धावीर महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली, मनामध्ये आतुरता निर्माण झाली... मग आणखी काही सग्या सोयऱ्यांना, गावकऱ्यांना घेऊन ही मंडळी श्री धावीर महाराजांच्या दर्शनाला आली... तिथूनच ही वारी सुरू झाली... त्यानंतर कुटुंब वाढली, कुटुंबातील सदस्य वाढले, मुलं मुली नातवंड जावई सूना एक एक करून संख्या वाढू लागली. आज एकेका तांड्या बरोबर चारशे ते पाचशे भाविक असतात... नगरपालिके समोरील खलाटीत राहुट्या टाकून गेली कित्येक वर्ष हे सर्वजण साधेपणाने राहतात. आजही श्री धावीर देवस्थान ट्रस्ट, रोहा नगर परिषद आणि नागरिक या भक्तांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात...

Post a Comment

Previous Post Next Post