अब्दुल सोगावकर
सोगाव : देशात १३ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात व ऑगस्ट महिन्यात एकदा अशी जंतनाशक गोळी १ ते १९ वयोगटातील मुलामुलींना देण्यात येत आहे. जंताच्या प्रादुर्भावामुळे मुलांना कुपोषण आणि रक्तक्षय होऊन सतत थकवा जाणवतो, यामुळे मानसिक वाढ व मानसिक विकास पुर्णतः होत नाही...
यासाठी १ ते ६ व ६ ते १० तसेच १० ते १९ यावयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे...
या जंतनाशक दिनानिमित्त शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी अलिबाग तालुक्यातील पेढांबे येथे आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथे '१३ फेब्रुवारी च्या राष्ट्रीय जंतनाशक दिन' यानिमित्ताने प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी जंतनाशक दिनाबद्दल व जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी तसेच या मोहिमेतून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी महत्त्वपूर्ण प्रशिक्षण व माहिती शिबिरातील उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे ज्या मुलामुलींना १३ फेब्रुवारी २०२४ रोजी जंतनाशक गोळी देण्यात काही वैद्यकीय व इतर काही अडचण आल्यास त्या मुलामुलींना २० फेब्रुवारी २०२४ रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जेणेकरून यामध्ये एकही मूल जंतनाशक गोळी पासून वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे...
या प्रशिक्षण शिबिरात पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.भक्ती पाटील, आरोग्य सहाय्यक गणेश गायकवाड व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र, पेढांबे परिक्षेत्रातील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
फोटो लाईन : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथे उपस्थित आरोग्य अधिकारी, डॉ., आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व इतर,

