अब्दुल सोगावकर अलिबाग
हजारो जनावरांचा चारा, जंगली पशुपक्ष्यांचे घरटे, अधिवास व औषधी वनस्पती जळून खाक, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठ्या विस्तीर्ण स्वरूपात वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या रामधरणेश्वर डोंगरावर सोमवार दि. १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी अज्ञात समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात आग लावली होती...मात्र आग विझवेपर्यंत होत्याचे नव्हते झाले. यामध्ये निसर्ग संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त करत या समाजकंटकावर वनविभागाने कारवाईची मागणी केली आहे...
कोट : रामधरणेश्वर जंगलभागातील आगीच्या घटना रोखण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. वनविभागाने डोंगराळ भागात गस्त वाढवून आग लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून निसर्ग संपत्तीचे नुकसान टाळावे. तसेच वनविभागाच्या परिसरातील प्रत्येक गावात वनविभागाने वनसंरक्षण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून वनरक्षा ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून वनसंपत्तींचे रक्षण करावे.सचिन घाडी -सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी, मूनवली - अलिबाग.
कोट : सध्या लागत असलेले वणवे हे मानवनिर्मित असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, काही समाजकंटक जाणीवपूर्वक निसर्गसंपत्तीचे व आपल्या देशाच्या मालमत्तेचे नुकसान करत आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहे, आमची वनविभागाच्या मार्फत वनक्षेत्रात गस्त चालूच आहे, वनकर्मचारी यांची कमतरता असल्याने वणवा विझवण्यात उशीर होत आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे, येत्या काही दिवसांत हि भरती प्रक्रिया पूर्ण होईल. जर आम्हाला वणवा लावताना अथवा सहभाग घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास वनअधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार नुकसान किंमत ५ हजार दंड व दोन वर्षांचा सक्षम कारावासाची शिक्षा असे शिक्षेचे प्रावधान आहे, त्या दृष्टीने अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वनविभागाच्या तर्फे वणवाबाबतीत गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. जंगलात लावलेले वणवे जर वेळीच रोखले नाही, तर अन्न नसल्यामुळे जंगल भागातील वन्यप्राणी, बिबटे, रानडुकरे, सरपटणारे प्राणी आदी हिंस्त्रप्राणी अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून हे वणवे नागरिकांनी लावू नये, वणवा लागला असता नागरिकांनी वनविभागाला संपर्क साधून वणवा विझविण्यासाठी सहकार्य करावे. - तुकाराम जाधव - वनविभाग अधिकारी, अलिबाग- रायगड,
फोटो लाईन :अज्ञात समाज कंटकाने रामधरणेश्वर डोंगरावर आग लावल्यानंतर नष्ट झालेला जनावरांचा चारा व वनस्पती झाडे,
