महाराष्ट्र वेदभुमी

न्हसाडी धरण होणार की नाही ? म्हसाडी धरणावर खासदारांची चुप्पी का ?


रोहा - विशेष प्रतिनिधी 

संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारेंचा सवाल

आता तांबडी लघु धरणाचा घाट, म्हसाडी धरणाचे काय झाले ? चणेरावासियांचा सवाल 

रोहा तालुक्यात प्रस्तावीत म्हसाडी धरणाचे नेमके काय झाले, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनिल तटकरेंनी गाजावाजा करत भूमिपूजन केलेल्या म्हसाडी धरणाला मूहूर्त कधी, म्हसाडी धरण होणार आहे का ? यावर कधीच थेट न बोलणाऱ्या खा. सुनिल तटकरेंनी आता तालुक्यात तांबडी धरणाचा घाट घातल्याने म्हसाडी धारणाचे काय झाले, यावर खा तटकरेंनी बोलावे, असा संतप्त सवाल बुधवारी चणेरावासियांनी केला आहे. दरम्यान, महत्वकांक्षी म्हसाडी धरणावर खा सुनिल तटकरेंची नेहमीच चुप्पी का, यामागे नेमके गौडबंगाल काय ? असा सवाल म्हसाडी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी केला आहे...

तालुक्यात मागास राहिलेल्या चणेरा भागाच्या विकासाकडे नेहमी दुर्लक्ष होत आहे, या मागास भागात विविध प्रकल्प आणण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या. आधीच्या प्रास्तावीत म्हसाडी धरणाचे काय झाले ? असा सवाल वारंवार विचारला जात असतानाच आज खा. सुनिल तटकरे यांनी तांबडी लघु धरणाचे भूमिपूजन केले. पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी धरणाचा लाभ होईल असे त्यांनी सांगितल्याने आमच्या म्हसाडी धरणाचे काय झाले ? खासदारांनी यावर बोलावे, चणेरावासियांना अजून किती दशके मागास ठेवणार आहात ? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ भारत पाटील यांनी दूरध्वनीवरून दिली...

म्हसाडी धरणाचे भूमिपूजन १३ ऑक्टो २०११ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी गाजतवाजत केले. एफ.ए. कंन्स्ट्रक्शनला काम देण्यात आले. एक कोटी रुपये खर्ची देखिल पडले. मात्र धरणाच्या कामात एक दगडही चढला नाही. याउलट सबंधीत प्रशासनाची अधिसूचना नसताना भूमिपूजन करण्यात आले, हे समोर आल्याने हेच का ते मंत्री ? अशी अनेकदा चर्चा झाली.

अखेर एफ.ए. कंन्स्ट्रक्शनचे खत्री कोर्टात गेले, असे सांगितले गेले, म्हसाडी धरणासाठी रोहा तालुक्यातील पश्चिम खोरा आजही आग्रही लढत आहे, म्हसाडी धरणावर खासदारांची चुप्पी का ? असा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी केला आहे... दरम्यान, चणेरातील म्हसाडी धरणाकडे माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते, खा सुनिल तटकरे, ना आदिती तटकरे, अलिबागचे आ महेंद्र दळवी यांनी आजतरी लक्ष दिलेले नाही, त्यातच खा. तटकरेंनी तांबडी धरणाचा घाट घातल्याने आमचा म्हसाडी धरण कधी होणार? असा सवाल पुन्हा चणेरावासियांनी केला. यावर खा तटकरे आतातरी याविषयावर बोलतात का ? हे लवकरच समोर येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post