माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
गोरेगांव ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन.म.न.से.शहर प्रमुख केतन गोरेगांवकर यांचे विधान
“तुम्ही मराठी भाषेत पाट्या का लावू शकत नाही? कर्नाटकातसुद्धा असाच नियम आहे... असं नाही केलं तर दुकानदार मराठी फॉन्ट छोटा ठेवतात. आता नाताळ आणि नववर्ष येत आहे, त्यामुळे व्यापार वाढवण्याची चांगली संधी आहे... तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठी भाषेत पाट्या असण्याचे फायदे माहिती नाहीत का?” असा प्रश्न म.न.से. शहर प्रमुख केतन गोरेगांवकर यांनी केला आहे...
राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे... ते म्हणतात, “पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार... 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली...
मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं... तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे...
असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे... महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे...
दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा... आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका...'मराठी पाट्या' याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन...तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत.” असं ते म्हणतात...
महिनाभर आधी या संदर्भात म.न.से.शहर प्रमुख केतन गोरेगांवकर यांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केले होते. परंतू गोरेगांव ग्रामपंचायतीने मराठी पाट्या लावण्याकरिता अध्यापही कोणते पाउल उचललेले नसल्याचे दिसून येत आहे... सरपंच जुबेर अब्बासी यांनी १ जानेवारी २०२४ पर्यंत जर योग्य ती कारवाई मुजोरखोर दुकानदारांवर या संदर्भात केली नाहीतर आम्ही गोरेगांव ग्रामपंचायतीसमोर म.न.से.स्टाइल आंदोलन करू असे म.न.से.शहर प्रमुख केतन गोरेगांवकर यांनी सांगितले आहे...