महाराष्ट्र वेदभुमी

खा. सुनिल तटकरे सोमवारी रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी करणार

 


रोहा दि. ३१ डिसें. प्रतिनिधी :- 

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल आपण लवकरच या रस्त्याची पाहणी करू असे खा. सुनिल तटकरे यांनी मागील आठवड्यात रोहा येथे सांगितले होते. त्याप्रमाणे उद्या सोमवार दि. १ जाने. रोजी सकाळी 11 वाजता वडखळ ते कोलाड आणि सायंकाळी 4 वाजता इंदापूर ते लोणेरे दरम्यान खा. सुनिल तटकरे हे रस्त्याची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील जगताप यांनी दिली आहे...

मुंबई गोवा महामार्गावरील उदवस्थ असलेल्या नागोठणे ते वडखल रस्त्याच्या कामाकडे ठेकेदार एजंसी दुर्लक्ष करीत आहे, पावसाळ्यात खड्डे भरण्याचे नाटक करतात, पाऊस जाऊन तीन महिने झाले, याकाळात उघडीप पडल्यावर रस्त्याची डागडुजी करने आवश्यक असताना एजंसी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, या रस्त्याची परिस्थिती बिकट झाली असून लोक यामार्गाने प्रवास करीत नाहीत, परिणामी दक्षिणेकडील वाहतुकीचा भार पाली- खोपोली रस्त्यावर आला आहे, याविषयी मागील आठवड्यात खा. सुनिल तटकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोह्यातील पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता आपण या रस्त्याची पहाणी करून संबंधितांना निर्देश देऊ असे तटकरे यांनी त्यावेळी सांगितले होते. खा. सुनिल तटकरे सोमवारी या रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वडखळ मार्गाची पाहणी करणार आहेत, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाळ्यात या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी एकामागून एक असे मॅरेथॉन पाहणी दौरे केले परंतु हा रस्ता काही त्यांना सुस्थितीत करता आलेला नाही. आता सुनिल तटकरे हे पाहणी दौरा करणार असल्याने या रखडलेल्या रस्त्याचे भवितव्य काय ते लवकरच समोर येणार आहे.



- हा रस्ता आता मिलिटरीकडे दया -


या महामार्गाच्या एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण सुरू करताना दुसरी मार्गिकेला डांबरीकरण करून प्रवासी वाहतुकीसाठी सुस्थितीत करून देणार असल्याचे वर्षभरापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी बैठकीत सांगितले होते. यासाठी एन.एच.ए.आय. ने रस्ते सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून 12 कोटीचा निधी मंजूर केला असल्याचेही त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु वाहतुकीसाठी एक मार्गिका सुस्थितीत करण्यात त्यांना अपयश आले आहे, नागोठणे ते वडखळ मार्ग पूर्णपणे उदवस्थ आहे. हा रस्ता तुमच्याने होत नसेल तर आता इंडियन आर्मी मिलिटरीकडे तो सोपविण्यात यावा अशी मागणी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केली आहे.



चौकटीत ;-- या रस्त्याच्या कामाचे काँक्रीटीकरण सुरू झाले परंतु ज्याठिकाणी रस्ता चांगलं आहे त्या शिरढोण पनवेल येथे कामाला सुरुवात केली गेली.

- कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाला आधी मंजुरी मिळाली, या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे, वाकण नाका ते पळस -कोलेटी वाहन हाकने जिकरीचे होते, या रस्त्याचा एक ट्रॅक पूर्णपणे उध्वस्त झालेले असल्याने वाहन चालक चुकीच्या मार्गाने रोंग साईडने वाहने हाकतात, त्यामुळे अपघात होत आहेत...- नॅशनल हायवे प्रशासन या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे, येथे कामाला गती देण्याची, पावसाळ्यापूर्वी नागोठणे ते पळस -कोलेटी हा रस्ता सुस्थितीत करणे गरजेचे होते, कासू ते इंदापूर या टप्प्यातील कामे सुरुवातीला हाती घेतले असते तर थोडाफार प्रवाशांना दिलासा मिळाला असता, परंतु जेथे रस्ता चांगला आहे त्या पनवेलकडे एन. एच. ए. आय. ने कामास सुरुवात केली...-  लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना हायवे प्रशासन ठेकेदारांच्या सोयीच्या या कामांना प्राधान्य देत असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post