रोहा दि. २६ नोव्हें. विशेष प्रतिनिधी
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम!
मैला मिश्रित प्रदूषित पाणी नाल्याद्वारे थेट नदीत सोडण्यात येत असल्याने रोहा शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका प्रदूषित झाली आहे, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली असुन वारंवार ही गंभीर बाब निदर्शनास आणून ही प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे, कुंडलिका नदी बचाव समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप वडके यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत...
नदीबचाव समितीचे ज्येष्ठ दिलीप वडके यांचा शासनाकडे पाठपुरावा
रोह्यात कुंडलिका नदी संवर्धन योजना झाली, परंतु या योजनेत शहराचे मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने कुंडलिका नदीतील प्रदूषणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे, शहराच्या नाल्यांतून वाहणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. नाल्याचे पाणी काळेकुट्ट झाले असून त्यामध्ये विविध प्रकारची घाण साचली आहे. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि कुंडलिका नदी बचाव समितीचे संस्थापक दिलीप वडके यांनी ठोस पुरावे देत नदी प्रदूषणाचा प्रश्न समोर आणले आहे. यासाठी शासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून वडके यांनी नदी प्रदूषणाबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.
नदीमध्ये मानव निर्मित सुरू असलेल्या प्रदुषणाविषयी प्रदुषण मंडळाने रोहा नगरपालिकेला पत्र लिहून सदर विषयी तातडीने कारवाई करावी म्हणून सूचना ही केली...परंतु रोहा अष्टमी नगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे दिवसेंदिवस कुंडलिका नदीचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे...
प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेचे नदीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष!
रोहा शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरी वसाहतीमधील सांडपाणी गटारामार्गे आजही सोडले जात आहे. नदित सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करने आवश्यक असताना, या गंभीर समस्येकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचे वडके यांनी स्पष्ट केले आहे...
नदीचे पाणी पूर्ववत करावे जेणेकरून ग्रामस्थांना ईतर कामांकरीता योजना तयार करून पाणी वापरात आणता येईल... नुकतेच रोहा शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता...असा प्रसंग नेहमीच येत असतो...अशा वेळी नदीचे बारमाही वाहणारे पाणी वापरात येऊ शकते, परंतु प्रदूषणामुळे नदिचे अस्तित्व नष्ट होत चालल्याचे दिसून येत आहे...
रोहा अष्टमी शहरातील नदीला मिळणाऱ्या नाल्यातून कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याच्या कारणावरून रोहा अष्टमी नगरपालिकेला सर्व नागरिकांच्या सहीने नोटीस बजावण्याच्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिलीप वडके यांनी दिली आहे...
प्रतिक्रिया ;-
नगरपालिकेची भुयारी गटार योजना काही तांत्रिक कारणाने रखडली आहे, ती पुनर्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, सदर योजनेअंतर्गत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमार्फत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सोडले जाईल. त्यासाठी थोडी अवधी लागणार असून नदी प्रदूषणाबाबत तात्पुरती स्वरूपात दुसरी उपाययोजना शक्य नाही.- पंकज भुसे, मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद
रोहा शहराचा मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याने नदी प्रदूषित होऊन मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे. नाल्यामधून नदीत मिसळणारे पाणी प्रक्रिया करून सोडावे, असा नियम आहे. मात्र त्याकडे नदी संवर्धन योजनेत त्याकडे दुर्लक्ष केले गेले. वारंवार निदर्शनास आणूनही रोहा नगर पालिका आजही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे- दिलीप वडके ज्येष्ठ पत्रकार ,संस्थापक,कुंडलिका नदी बचाव समिती
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे, मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही, हे रोहा अष्टमीकरांचे दुर्दैव आहे-नितीन परब, अध्यक्ष - रोहा सिटीझन फोरम